आंतरजिल्हा वाहतुकीस आजपासून झाली सुरुवात


आंतरजिल्हा वाहतुकीस आजपासून झाली सुरुवात

लालपरी झाली प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज!

प्रवास करताना आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्याचे एसटीचे आवाहन

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे 

- कोरोना प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली राज्य परिवहन महामंडळाची आंतरजिल्हाबस सेवा आज पूर्ववत आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करीत सुरु झाली. प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद मिरवणारी एसटी बसेस ने आज जिल्हा मुख्यालयाच्या माळीवाडा, स्वस्तिक आणि तारकपूर बस स्थानकातून प्रवाशांसह इच्छित स्थळी प्रयाण केले, तेव्हा एसटीचे सर्व वाहक, चालक आणि सर्व अधिकारी-कर्मचारीही आनंदले आणि प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले.

          गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करावा लागत होता. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने आंतरजिल्हा प्रवास करणे जवळपास थांबले होते. आता मात्र, राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर आज अधिकृतपणे या सेवेस प्रारंभ झाला.

          नगर येथून नाशिक, पुणे, औरंगाबाद साठी बसेस रवाना झाल्या. आंतरजिल्हा बससेवा सुरु झाल्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय आता दूर होणार आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागीय कार्यालयाच्या सूचनांनुसार एस.टी. बसस्थानक प्रमुखांनी तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकांची स्वच्छता करुन घेतली. एस.टी.मध्ये बसणार्‍या प्रवाशांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले होते. स्वताचे आरोग्य सांभाळावे तसेच इतरांचे आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात येत होते. बसचे वाहक आणि चालकांनीही बसेस सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

          लॉकडाऊनच्या काळात काही दिवसांपूर्वी केवळ जिल्ह्यातंर्गत वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली होती. आजपासून आता आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी देण्यात आली.

          दरम्यान, नागरिकांनी बस स्थानके तसेच परिसरात आणि प्रत्यक्ष प्रवास करताना आरोग्यविषयक नियम पाळावेत. चेहर्‍यावर मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.                                        ****

जाहिरात
Search
विडिओ
Recent News