थोडसं मनातलं... सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडसं मनातलं...  सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय?  ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो,  सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 थैमान घालतोय. त्याची चांगलीच झळ महाराष्ट्राला बसली आहे. महाराष्ट्रातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु अजुनही कोविड-19 पुर्णपणे आटोक्यात येत नाही. तसेच कोविड-19 चे पेशंट बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे ही सुद्धा दिलासा देणारी बाब आहे. परंतु या कोविड-19 मुळे अनेक कोरोना योद्धे आणि सर्व सामान्य जनता बळी गेले आहेत. असे असले तरी सरकारने अनलाॅकडाऊन भाग तीन मध्ये खुपच मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे त्यामुळे सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता जवळपास सर्व उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. परंतु खरंच सरकारने कोविड-19 च्या बाबतीत पारित केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन होते का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.  आज पासुन महाराष्ट्र सरकारने "लालपरी" ला एका जिल्ह्यातुन दुस-या जिल्ह्यात प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांच्या आवडीची  "एसटी" आता महाराष्ट्रात प्रत्येक रोडवर धावताना दिसणार आहे, ही जरी सर्व सामान्य जनतेला दिलासा देणारी बाब आहे असे वाटत असले तरी त्याचे तोटे सुद्धा भोगायला लागणार आहेत. आता सध्या कोविड-19 ने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खेड्यापाड्यातील काही ना काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. लालपरी सुरू झाल्या नंतर प्रवाशी वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे एसटी मध्ये प्रवास करणारे लोकांची कोरोना चाचणी कोण करणार? फक्त मास्क आणि सॅनिटायझर वापरून कोविड-19 आटोक्यात येणार नाही, त्या साठी प्रवाशांना एसटी मध्ये प्रवेश देताना प्रवाशांची संपूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे, नाहीतर कोविड-19 चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. खरं सांगायचं तर कोरोना जातपात आणि धर्म पहात नाही, त्याला आटोक्यात आणण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवण्याची गरज आहे तसेच संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नियम केले आहेत पण त्या नियमाचे अक्षरशः धिंदवडे उडवले जात आहेत. सध्या बिगर पास चे सुद्धा अनेक प्रवाशी एका जिल्ह्यातुन दुस-या जिल्ह्यात बिनधास्त पणे प्रवास करतातच ना. कोण लक्ष देतंय त्यांचे कडे? तसेच ई पास कमी जास्त पैसे देऊन एजंट मार्फतच मिळवले जातात.  सध्या सगळी कडेच " आंधळं दळतंय अन् कुत्रे पीठ खातंय" अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. आता सरकारने  लालपरी ला परवानगी दिली आहे, परंतु  "ई पास" शिवाय  खाजगी वाहने वापरण्याची परवानगी दिली नाही. मग हा दुजाभाव कशासाठी केलाय. जर प्रवास करण्यासाठी लालपरी  जिल्हा बंदी उठवली आहे तर सर्व सामान्य जनतेला सुद्धा त्यांचे खाजगी वाहने वापरण्याची परवानगी द्यायला काहीच हरकत नाही. तसेही लोक बिगर पास शिवाय दररोज प्रवास करतातच. त्यामुळे अटी शर्ती घातल्या काय अन नाही घातल्या काय काहीच फरक पडत नाही. जो पर्यंत बेजबाबदार लोकांना शासकीय आणि राजकीय वरदहस्त आहे तो पर्यंत नियमाची पायमल्ली होणारच हे त्रिवार सत्य आहे. फक्त गोरगरीब जनता आणि सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोकांनाच नियम लागु आहेत असे स्पष्ट पणे वाटते. जर सरकारला खरोखरच कोविड-19 आटोक्यात आणायचा असेल तर स्थानिक प्रशासनाला सर्व अधिकार दिले पाहिजेत आणि मोकळ्या हाताने काम करण्याची परवानगी दिली पाहिजे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. सरकारने फक्त काही तुघलकी निर्णय घेऊ नयेत. अहमदनगर जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातील किती तरी लोक दररोज येतातच. आणि त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आले आहेत. त्यामुळे निश्चितच अहमदनगर मध्ये बाहेरून येणारे  लोकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी सुरू करायला हरकत नाही पण गणेशोत्सव आणि मोहरम संपल्यावर एसटी सुरू केली असती तर अधिक चांगले झाले असते. पण सध्या तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापल्या लोकांची "सोय" करावीच लागते हे पण सत्य आहे. इंग्रजी राजवटीत ज्या ज्या वेळी इंग्रज सरकारने भारतीय लोकांना त्रास देण्यासाठी चुकीचे निर्णय घेतले तेव्हा तेव्हा भारतीय लोकांनी इंग्रजांना खडसावले होते आणि  " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? " हे ठणकावून विचारले होते. आजही स्वतंत्र भारतातील जवळपास सर्व सामान्य जनतेला तोच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. अगोदर च अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सध्या कोविड-19 ने त्रासली आहे. शासकीय व खाजगी हाॅस्पिटल मध्ये लवकर बेड सुद्धा मिळत नाहीत. जे काही आठ दहा  हाॅस्पिटल मधील बेड आता आठ दिवसापूर्वी आरक्षित केले आहेत त्या ठिकाणी सुद्धा पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. दररोज कोविड-19 चे पेशंट चे बाबतीतले शासकीय  नोडल ऑफीसर चे रिपोर्ट बघून काळजाचा ठोका चुकत आहे. असे असले तरी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी एकत्र येऊन अनेक ठिकाणी कोविड-19 चे सेंटर सुरू केले आहेत त्या मुळे तरी लोकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या तरी घाबरून जाता कामा नये. लोकांनी फक्त जर कोविड-19 चे लक्षण दिसत असतील तर निःसंकोचपणे स्वतःची मोफत ॲन्टीजन चाचणी शासकीय दवाखान्यात करून घेतली पाहिजे. चला , कोण नियम पाळतील, कोण नाही पाळणार याची चिंता आता आपण करायची नाही. जे सुजाण नागरिक असतील ते निश्चितच शासकीय सूचना चे काटेकोर पालन करतीलच यात शंकाच नाही. जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक कोरोना योद्धे बळी गेले आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे असे वाटते आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News