महान गुरुंची व संतांची शिकवण धारण करुन श्रेष्ठ जीवन जगावे


महान गुरुंची व संतांची शिकवण धारण करुन श्रेष्ठ जीवन जगावे

विठ्ठल होले पुणे

मुक्ती पर्व दिवसानिमित्त सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे आवाहन

बारामती (प्रतिनिधी) - पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वत: आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करुन आपण श्रेष्ठ जीवन जगावे. संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांसह समस्त मानव-मात्राला आवाहन करताना उपरोक्त उद्गार व्यक्त केले.

शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी मुक्ती पर्व दिवसाच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन संत समागमामध्ये त्या बोलत होत्या.  या ऑनलाईन संत समागमामध्ये देश-विदेशातील अनेक निरंकारी भक्तगणांनी भाग घेतला त्यामध्ये बारामतीसह महाराष्ट्रातील काही प्रतिनिधीही सहभागी झाले होते. 

  संत निरंकारी मिशन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना बरोबरच मुक्ति पर्व दिवस आयोजित करते ज्यामध्ये मिशनचे अगोदरचे गुरु तसेच महान संतांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते.  त्यामध्ये शहनशाह बाबा अवतार सिंह जी, जगत माता बुद्धवन्ती जी, निरंकारी राजमाता कुलवंत कौर जी, पूज्य माता सविंदर हरदेव जी तसेच अशा अनेक भक्तांचा समावेश आहे ज्यांनी मिशनचा सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश जना-जनापर्यंत पोचविण्यासाठी आपले जीवन वेचले.

  सद्गुरु माता सुदीक्षा जी यांनी सांगितले, की जर मुलांचे जीवन उच्च मानवी मूल्यांनी युक्त व्हावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर कुटुंबातील जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचे आचरण आदर्श असायला हवे. कारण मुले नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करत असतात.  मोठ्यांना त्यांचे जीवन श्रेष्ठ बनविण्यासाठी सदोदित सत्याच्या मार्गावर चालत राहणे गरजेचे आहे.

  मुक्तिच्या संदर्भात सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की जेव्हा आत्मा आपल्या निजस्वरुपाला जाणून तद्रुप होतो तेव्हा त्याला मुक्तीचा अनुभव येतो. त्याच्या जन्ममृत्यूची श्रृंखला तुटून जाते. जीवन प्रवास चालूच राहतो; पण भौतिक जीवनातील चढ-उतारांनी किंवा सुख-दु:खांनी तो विचलीत होत नाही. असे जीवनमुक्त व सहज-सुंदर जीवन जगण्यासाठी ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आपले निजस्वरुप असलेल्या निराकार ईश्वराशी नाते जोडणे आवश्यक आहे. प्रभु-परमात्म्याशी नाते जोडून जो सदाचारी जीवन जगतो तो मुक्तिचा अधिकारी बनतो, त्याचे जीवन सार्थक होते.

 या ऑनलाईन मुक्ति पर्व समागमामध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील निरंकारी मिशनच्या अनुयायांनी विचार, भक्तीरचना, भजन तसेच कवितांच्या माध्यमातून मिशनच्या पूर्वसूरिंना आपली श्रद्धासुमने अर्पण करण्याबरोबरच त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News