थोडसं मनातलं... गणेशोत्सव आणि मोहरम मध्ये संचारबंदी चे काय ? ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडसं मनातलं... गणेशोत्सव आणि मोहरम मध्ये संचारबंदी चे काय ? ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो 

सध्या अहमदनगर शहरात कोरोना चांगलाच घुसलाय. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना ग्रस्तांची संख्या पहाता कोविड-19 कधी एकदाचा आटोक्यात येईल असे झाले आहे. आत्ता कुठे तरी काही उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत तर गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध झाला आहे. कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे, तसेच सायंकाळी 7 ते सकाळी 5  पर्यंत कडक  संचारबंदी लागू केली आहे. सध्या प्रशासनाने जरी नियम लागु केले असले तरी नागरिकांनी परिपूर्ण नियमाचे काटेकोर पालन केलेच नाही आणि करतही नाहीत. महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन कारवाई करतच आहे. आता 22 ऑगस्ट 2020 पासुन गणेशोत्सव सुरू होत आहे आणि त्यानंतर लगेच मोहरम येत आहेत. गेल्या दोन वर्षांत गणेशोत्सव आणि मोहरम एकत्रच येत आहेत. आता तर कोविड-19 चे सावट सर्वच सणउत्सवावर आले आहे. अहमदनगर मधील जे मानाचे गणपती आहेत त्यांनी पोलिस प्रशासन यांचे सोबत बैठक घेतली व विनामंडप गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे असा खुलासा केला आहे. असाच निर्णय जर अहमदनगर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी घेतला तर निश्चितच कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल. एक तर कोविड-19 ची वाढणारी संख्या पाहता गणपतीची आरास पहायला लोक बाहेर पडणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. तशातच सायंकाळी 7 नंतर संचारबंदी असल्याने नागरिकांना मनमोकळेपणे फिरताही येणार नाही. जर जास्त प्रमाणात गर्दी जमा झालेली दिसली तर प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासला जाईल आणि विनाकारण कोणी तरी प्रशासनाचे विरूध्द न्यायालयात दाद मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मोहरम च्या बाबतीत सुद्धा आहे. मोहरम ची कत्तलची रात्र ची मिरवणुक आणि दुस-या दिवशी निघणारी मुख्य मिरवणुकीस होणारी रात्र या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. संचारबंदी च्या काळात या मिरवणुका काढता येतील का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जिल्हा प्रशासन एकदा संचारबंदी चे पारीत केलेले आदेश मागे घेतील का?. त्यामुळे गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही उत्सव कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीच आता काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करणारे मंडळी आणि मोहरम ची कमीटी यांनीच चांगले निर्णय घेऊन अगदी साध्या पध्दतीने गणेशोत्सव आणि मोहरम साजरे करावेत हिच विनंती आहे. अहमदनगर शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आणि त्याची साखळी खंडीत होऊन कोरोना आटोक्यात येईल असे काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. यापूर्वी हिन्दु आणि मुस्लिम बांधवाचे अनेक सणउत्सव आले,तसेच अनेक महापुरूषांच्या जयंती व इत्यादी उत्सव आले. परंतु सर्व सणउत्सव साधे पणाने साजरे करून  सर्व धर्मियांचे सुजाण नागरिकांनी अतिशय चांगला आदर्श निर्माण केला आहे. तसाच आदर्श आता निर्माण करण्याची वेळ आली आहे. एवढे असुनही जर जनतेने ऐकलेच नाही तर शेवटी प्रशासन त्यांचे नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करतीलच यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु आतापर्यंत अहमदनगर शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार मंडळी, गणेशोत्सव आणि मोहरम चे पदाधिकारी, शांतता समिती चे सदस्य आणि सर्व धर्मियांचे सुजाण नागरिकांनी प्रशासनाला नेहमीच चांगले सहकार्य केले आहे आणि यापुढेही ते निश्चितच सहकार्य करतील अशी खात्री आहे. अहमदनगर शहरातील कोविड-19 ची परिस्थिती भयानक निर्माण झाली आहे. रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. आपण आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती. येणा-या गणेशोत्सव आणि मोहरम मध्ये आपणच शासकीय नियमाचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News