लोकप्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी टक्केवारी व टोळवाटोळवीत गुंतल्याचा आरोप
अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - महापालिका कर वसुली करुन देखील शहरातील नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा पुरवीत नसल्याच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचर विरोधी जन आंदोलनाच्या वतीने मंगळवारी दि.25 ऑगस्ट रोजी करवसूली सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
महापालिका नागरिकांकडून कर वसूली करीत आहे. मात्र नागरिकांना मुलभूत सोयी-सुविधा मिळणे अवघड झाले आहे. शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहे. नागरिकांना नळाद्वारे दुषित पाणी येते. तर अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. पाणी, वीज व रस्ते या प्रमुख नागरी सुविधांपासून सर्वसामान्य नगरकर वंचित आहे. कोरोनाच्या नावाखाली अजूनही या प्रश्नाची परिस्थिती गंभीर बनली आहे. लोकप्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी टक्केवारी व टोळवाटोळवीत गुंतलेले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. नगरकरांना मुलभूत सोयी सुविधा मिळण्यासाठी मंगळवारी हुतात्मा स्मारकात करवसूली सविनय कायदेभंगाचे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. तर शहरातील खड्डयात दिवसा दिवे लावून मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास नाकर्ते ठरलेले मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. वेबीनारच्या माध्यमातून या आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी होणार असून, नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनासाठी अॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहेत.