थोडसं मनातलं...कोरोना बाधीत रूग्ण राजकीय बळी ठरतात का? ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडसं मनातलं...कोरोना बाधीत रूग्ण राजकीय बळी ठरतात का? ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो,  अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्ता पर्यंत जवळपास तेरा हजाराचा टप्पा कोविड-19 च्या पेशंट ने ओलांडला आहे. तसेच जवळपास दहा हजार कोरोना बाधीत रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर मृतांची संख्या सुद्धा दिडशेच्या वर गेलेली आहे.वास्तविक ज्या अहमदनगर जिल्ह्यात सुरूवातीला फक्त एकच कोविड-19 चा पेशंट होता त्यात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे ही सुद्धा दिलासा देणारी बाब आहे. सध्या महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. पालकमंत्री सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे निश्चितच अहमदनगर चे प्रशासन हे पालकमंत्री यांचे आदेशाचे काटेकोर पालन करत आहे. ब-याच दिवसा पासून अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता आणि खासदार हे पुन्हा एकदा पुर्वीच्या प्रमाणे पुर्ण जिल्हा लाॅकडाऊन करावा म्हणून मागणी करत आहेत. परंतु पालकमंत्री महोदय याला तयार नाहीत. वास्तविक पालकमंत्री महोदय म्हणजे "आठवडी डाॅक्टर " सारखेच काम करतात असे वाटते आहे. त्यांचे गावाकडे जायचे असेल तर अनेक चेक नाके आहेत. तसेच त्यांच्या जिल्हयात दुसरे जिल्ह्यातील लोक आले तर लगेच कोरांनटाईन केले जाते. पण अहमदनगर जिल्हा म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. दररोज बाहेरच्या जिल्ह्यातील किती तरी लोक अहमदनगर शहरात येतात पण त्यांचेकडे कोणत्याही प्रकारची साधी विचारपूस सुद्धा केली जात नाही. आणि त्यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रसार जोरात सुरू आहे. सध्या कोविड-19 च्या रूग्णाना बेड मिळत नाहीत तर मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अमरधाम येथे नंबर लागतात. किती अवहेलना आहे ही. अहमदनगर मध्ये सध्या एकच विद्युतदाहिनी आहे त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी नंबर लागतात. खरं सांगायचं तर मा जिल्हाधिकारी साहेब यांनी जनतेसमोर असलेल्या प्रश्नाची जाण ठेवून अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पुर्वीच्या प्रमाणे पुर्ण जिल्हा लाॅकडाऊन करणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. नाहीतर खुपच गोंधळ निर्माण होणार आहे. कदाचित खासदार डाॅ सुजय विखे पाटील हे लाॅकडाऊन व कर्फ्यु लागु करा म्हणत असतील म्हणून आदरणीय पालकमंत्री महोदय श्री हसन मुश्रीफ साहेब याला तिव्र विरोध करत असावेत अशी शंका सुद्धा मनात येते. परंतु वास्तविक परिस्थिती पहाता कोविड-19 ची साखळी खंडीत होऊन कोरोना आटोक्यात येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे हे मात्र निश्चितच आहे. महाराष्ट्र सरकारने अनलाॅकडाऊन भाग तीन मध्ये खुपच मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे त्यामुळे सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे परंतु नागरिक सुद्धा शासकीय नियमाचे व सूचनांचे काटेकोर पालन करत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. अहमदनगर शहरातील अमरधाम येथे दररोज जवळपास दहा ते बारा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. केवळ राजकीय महत्वकांक्षे पोटी सर्व सामान्य गोरगरीब जनतेला मृत्युच्या दाढेत लोटू नका एवढी एकच विनंती आहे. मा. पालकमंत्री महोदय म्हणतात की, अहमदनगर मध्ये कोविड-19 ची परिस्थिती आटोक्यात आहे, पण साहेब इथे दररोज जवळपास चारशे ते पाचशे च्या वर पेशंट सापडत आहेत. त्यामुळे परिस्थिती कशी आटोक्यात आहे हे तुम्हीच सांगा साहेब? . अजून एकदा जरी  पुर्वीच्या प्रमाणे पुर्ण जिल्हा आठ दिवस जरी लाॅकडाऊन केला तर निश्चितच परिस्थिती आटोक्यात येईल यात शंकाच नाही. या काळात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यास काहीच हरकत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आ.संग्राम भैय्या जगताप साहेब व स्थानिक नगरसेवक, महापौर आणि सर्व सदस्य जनता यांचे सुद्धा मत जाणून घेणे गरजेचे आहे. अर्थात आता पुन्हा लाॅकडाऊन करायला निश्चितच काही लोकांचा विरोध असु शकतो यात सुद्धा दुमत नाही, परंतु जर लाॅकडाऊन व संचारबंदी कडक केल्याने जनतेचे प्राण वाचत असतील तर विरोध करणारे सुद्धा नक्कीच सहकार्य करतील अशी खात्री आहे. फक्त आता प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. नाहीतर कितीतरी लोकांचा राजकीय बळी गेल्याशिवाय राहणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती आहे. लोकांना आताच कुठे तरी रोजगार उपलब्ध झाला आहे हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही, त्यांची सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. परंतु आता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी नोव्हेंबर पर्यंत सर्व लोकांना अन्नधान्य मिळण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता फक्त आठ दहा दिवस जर लोक घरीच बसुन राहीले तर फार मोठ्या प्रमाणात अडचणी येणार नाहीत. परंतु जर कोविड-19 बाधीत झाले तर निश्चितच मोठी अडचण निर्माण होऊ शकते. एक मात्र निश्चितच आहेकी आता कोणत्याही सर्व सामान्य जनतेला खाजगी हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट केल्या नंतर बील भरण्यासाठी ऐपत नाही. त्यामुळे आदरणीय पालकमंत्री महोदय श्री हसन मुश्रीफ साहेब, जिल्हयातील  मंत्री महोदय ना.बाळासाहेब थोरात साहेब, ना.शंकराव गडाख साहेब, ना.प्राजक्त तनपुरे साहेब,  खासदार डाॅक्टर सुजय विखे पाटील साहेब, अहमदनगर चे स्थानिक आमदार श्री संग्राम भैय्या जगताप साहेब, तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदार साहेब,  स्थानिक नगरसेवक, सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, समाजसेवक, पत्रकार मंडळी, डाॅक्टर मंडळी यांचे उपस्थितीत मा जिल्हाधिकारी साहेब, पोलिस अधीक्षक साहेब आणि महापालिका आयुक्त साहेब यांनी स्वतंत्र बैठक आयोजित करून लवकरच लाॅकडाऊन व संचारबंदी चा निर्णय घेणे आवश्यक आहे तरच कोविड-19 चे बाबतीत काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता फक्त राजकीय कुरघोडी चे बळी ठरू नयेत अशी अपेक्षा आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या हिच अपेक्षा. आपणास विनंती आहे की आपण कृपया घराबाहेर पडू नये, तसेच शासकीय नियमाचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News