स्वातंत्र्यदिनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान


स्वातंत्र्यदिनी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान

पोलीस प्रशासनाचे कर्तव्य सेवा बजावण्यास प्रथम प्राधान्य - अखिलेशकुमार सिंह

नगर (प्रतिनिधी संजय सावंत -) प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. हे काम करीत असताना कुठल्याही प्रकारची तमा ते बाळगत नाहीत. कर्तव्य सेवा बजावण्यास ते प्रथम प्राधान्य देतात. आज या ठिकाणी माझ्या हस्ते माझ्या पोलीस बांधवांचा सन्मान होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. सन्मानामुळे तुमची जबाबदारी अधिक वाढते असे मला वाटते. सध्या कोरोना महामारीचे संकट असून, या महामारीवर आपण निश्‍चितच मात करू. मागील चार ते पाच महिन्यांपासून पोलीस कर्तव्यनिष्ठ भावनेने भूमिका बजावत आहेत. कोरोना यौद्ध्यांच्या बरोबरीने आपले काम करीत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात काम करीत असताना, पोलिसांनी आपल्या कुटुंबियांकडे लक्ष द्यावे. कोरोना महामारीचे संकट हे लवकरच दूर होईल, असा मला विश्‍वास आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक हरिष खेडकर राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल, अतिशय खडतर व दुर्गम भाग असलेल्या गडचिरोलीत कर्तव्य सेवा देणारे पीएसआय सतीश शिरसाठ यांना केंद्र सरकारचे पदक, सहाय्यक फौजदार रऊफ शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल, तसेच उत्कृष्ट सेवेबद्दल सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, चालक पोलीस नाईक अर्जुन बडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास सोनार यांचा पोलीस महासंचालकांचे विशेष सन्मानचिन्ह देऊन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. सिंह बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस अधीक्षक (गृह) प्राजक्ता सोनवणे, पोलीस उपविभागीय अधिकारी (ग्रामीण) अजित पाटील आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री. सिंह पुढे म्हणाले की, आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलीस प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांचा व कर्मचार्‍यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. अत्यंत उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावरील आनंदी व समाधानी भाव पाहून मनोमन आनंद झाला. प्रत्येकाने आपल्या कर्तव्य निष्ठेप्रती प्रामाणिक राहायला पाहिजे. पोलीस प्रशासनात सेवा देताना सामाजिक भान जपावे लागते. कोरोनाच्या संकट काळात नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत असून, सामाजिक संस्था पुढे येऊन करीत असलेले सामाजिक कार्य निश्‍चितच समाजासाठी उपयुक्त ठरले आहे, असे ते म्हणाले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपदी पदक जाहीर झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक हरिष खेडकर, गडचिरोलीत कर्तव्य सेवा देणारे पीएसआय सतीश शिरसाठ यांचा केंद्र सरकारचे पदक जाहीर झाल्याबद्दल, सहाय्यक फौजदार रऊफ शेख यांचा राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल, तसेच उत्कृष्ट सेवेबद्दल सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, चालक पोलीस नाईक अर्जुन बडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास सोनार यांचा पोलीस महासंचालकांचे विशेष सन्मानचिन्ह देऊन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस अधीक्षक (गृह) प्राजक्ता सोनवणे, पोलीस उपविभागीय अधिकारी (ग्रामीण) अजित पाटील आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (छाया/बबलू शेख, नगर.)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News