अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 32 गावांचा सिंचन पाणी प्रश्न सोडवून, त्यांना स्वयंपुर्ण करण्यासाठी साकळाई ठिबक सिंचन योजना कार्यान्वीत करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर ही योजना कार्यान्वीत करण्यासाठी जय शिवछत्रपती, जय माता साकळाईची घोषणा करण्यात आली आहे.
नगर व श्रीगोंदा तालुक्यातील 32 गावे साकळाई पाणी योजनेपासून आजही वंचित आहे. ही योजना पुर्ण करण्यासाठी अनेक राजकीय पुढार्यांनी आश्वासन दिले, प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. या योजनेला शास्त्रीय आधार नसल्याने ती बारगळली आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील पाझर तलाव भरुन पाणी देण्याची संकल्पना आहे. मात्र पाझर तलावांना पाणी सोडत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होते. सोडलेले पाणी लाभार्थी गावाला पोहचे पर्यंत मध्येच मोठ्या प्रमाणात पाणीचोरी होते. या योजनेचे साकळाई ठिबक सिंचन योजनेत रुपांतर केल्यास शेतकर्यांच्या थेट शेततळ्यात पाणी मिळणार आहे. पाणी ठिबक सिंचनद्वारे वापरण्याची पध्दत कार्यान्वीत केल्यास प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा शेतीसाठी योग्य वापर होणार आहे. तसेच शेततळ्यात शेतकर्यांना मत्स्य व्यवसायाला देखील चालना देता येणार आहे. या योजनेमुळे वाळकी, बाबुर्डी, खडकी खंडाळा, गुंडेगाव, सुरेगाव आदि 32 गावांचा कायापालट होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी डुबक पध्दतीने शेती चालू आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी सोडून देण्यात आल्याने माती वाहून शेती नापीक होते. तर पाणी देखील वाया जाते. शेतीसाठी ठिबक पध्दतीचा अवलंब केल्यास गाव पाणीबाबत स्वयंपुर्ण होणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. साकळाई ठिबक सिंचन योजना कार्यान्वीत करण्यासाठी समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, वृक्षमित्र आबासाहेब मोरे, कॉ.बाबा आरगडे, ओम कदम, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.