पर्यावरण संवर्धनाचा जागर करीत रोपवाटिका निर्मितीचे लक्ष्य पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या उपक्रमांना पदाधिकार्यांनी दिला उजाळा
अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत)
- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची राज्यस्तरीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (गुगलमीट) नुकतीच पार पडली. निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष तथा वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित पर्यावरण संवर्धनाचा जागर करुन राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली. या बैठकित महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले असल्याची माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख पै. नाना डोंगरे यांनी दिली. आबासाहेब मोरे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आज केलेले कार्य भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी आहे. निस्वार्थ भावनेने पर्यावरण संवर्धनाचे कार्य सुरु असून, प्रत्येक पदाधिकारी व सदस्य यामध्ये योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर वयाच्या दहाव्या वर्षी वृक्षारोपण करून सन 1982 पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन पर्यावरण संवर्धनाच्या कामास प्रारंभ केल्याचे सांगितले. तसेच पुढील वर्षासाठी स्थानिक देशी, ऑक्सिजन देणार्या जंगली बियाणांची रोपवाटिका निर्मितीचे लक्ष्य त्यांनी पदाधिकार्यांसमोर ठेवले. राज्यसचिव धीरज वाटेकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. बियाणांसाठी आवश्यकतेनुसार मंडळाचे सल्लागार वनश्री डॉ. महेंद्र घागरे यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मंडळातर्फे सातत्याने मांडल्या जाणार्या कार्बन क्रेडिटच्या मुद्दा बैठकित उपस्थित करण्यात आला. येत्या काळात घराच्या आसपास, बेडरूम, बाल्कनी, सोसायटीत, रस्त्याच्या कडेने लावावयाची झाडे, शेतकर्यांच्या बांधावर लावावयाची झाडे आदिंचे कौशल्याने नियोजन करण्यास सुचविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना घरातील दुधाच्या, तेलाच्या, किराणा मालाच्या पिशव्यांचा वापर करून प्रत्येकी 10 रोपे लावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. सन 2016 पासून मंडळाने राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलने घ्यायला सुरुवात केली. गतवर्षी हे संमेलन कोकणात चिपळूणला यशस्वी झाले. सन 2018 साली नोव्हेंबर महिन्यात तिसरे पर्यावरण संमेलन आणि भूतान ; राज्यातील 80 पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वी करण्यात आला. यावेळी पदाधिकार्यांना भूतानमधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांच्यासोबत पर्यावरणीय संवाद साधण्याची मिळालेली संधी मंडळाच्या कार्य इतिहासातील अत्यंत महत्वाची नोंद असल्याचे वाटेकर यांनी नमूद केले. या बैठकिचे संयोजक मंडळाचे राज्यसंघटक बाळासाहेब चोपडे यांनी सर्वांचे स्वागत केले. मंडळाचे कार्याध्यक्ष प्रमोद काकडे यांनी ऑनलाईन निसर्गकाव्य स्पर्धांची माहिती दिली. उपक्रमशील मुख्याध्यापक कचरू चांभारे यांनी लहान मुलांचे वृक्ष लागवड काम चांगले असल्याचे मत नोंदविले. डॉ. गौतम सावंत यांनी जैवविविधतेतील दुर्मीळ घटकांचा अभ्यास करण्याची गरज बोलून दाखविली. प्रियवंदा तांबोटकर यांनी आपल्या मंडळासोबतच्या मागील 20 वर्षांच्या आठवणीना उजाळा दिला. माधव केंद्रे यांनी शाळा चालू झाल्यानंतर पुन्हा राज्य चित्रकला स्पर्धा घ्याव्यात असे मत मांडले. प्रा. गजानन हिरोळे यांनी भूतान बाबतचे डॉक्युमेंट तयार करण्याची सूचना केली. उरण (रायगड), सांगली, माहूर (नांदेड) येथील प्रतिनिधींनी आगामी काळात राज्य पर्यावरणीय उपक्रम आपल्या भागात घेण्याची भावना बोलून दाखवली. समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी यांनी मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. बारामतीचे अतुलजी शहा यांनी मंडळाच्या कार्यालयास पदाधिकार्यांची बैठक घेण्यासाठी ऑनलाईन बैठकीचा संच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. राज्य प्रसिध्दीप्रमुख पै.नाना डोंगरे यांनी अहमदनगर जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमाची माहिती देवून, मंडळाच्या कार्याचा प्रचार व प्रसार चालू असल्याचे सांगितले. या बैठकित मंडळाचे पदाधिकारी जयसिंगराव जवक, प्रमोद मोरे, डॉ. ललिता जोगड, कांचन सावंत, तुकाराम अडसूळ, संजय ताडेकर, सुधीर कुंभार, अतुल निगवेकर, सिद्धार्थ पटणी, भाऊसाहेब पाटील, मधुकर गायकवाड, माधुरी अहिरे, मनाली देशमुख, काजल बनोडे, माधव केंद्रे, मारुती कदम, नाना पाटील, नवनाथ लाड, निर्मला म्हस्के, पंडितराव म्हस्के, प्रणिता बोरकर, राहुल पाटील, बाळासाहेब कोकरे, रुपाली पाटील, संजय तेडेकर, साईनाथ लोणे, सुहास गावित, सुजित गावित, विजयाचंद्र पाटील, अतुल निगवेकर आदिंनी सहभाग नोंदवला. कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी मंडळाने जाहीर केलेला पर्यावरण प्रकल्प उपक्रमाची माहिती देऊन वनश्री प्रतिज्ञाचे वाचन करुन बैठकिचा समारोप केला.