नमस्कार मित्रांनो, अहमदनगर महापालिका सध्या वेगवेगळ्या कारणांनी आणि विषयांनी खुपच गाजतेय. अहमदनगर चे सोशीक नागरिक या सर्वच विषयांवर खमंग चर्चा करतात. परंतु आपलं कोण मेलं म्हणून सोडून सुद्धा देतात. रोजचंच मढं अन् त्याला कोण रडं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेतील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे "कुटाणे" करायला वेळ मिळतोय पण जनतेच्या कामासाठी वेळ मिळत नाही. कर्मचारी यांचे विषयी कोणी बोलले तरी ते लगेच कामबंद अंदोलने करण्याची धमकी देतात व केसेस करण्याचे हत्यार उपसतात. अहमदनगर शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात महापालिका चे अखत्यारीत असलेल्या शासकीय व खाजगी हाॅस्पिटल यांनी तर कहरच केलाय. रोज नवीन नवीन घटना घडतच असतात. कुणी जास्त बील आकारले म्हणून तक्रार करतात तर कुणी शासकीय दवाखान्यात सुविधा मिळत नाहीत म्हणून तक्रार करतात. खरं तर सध्या महापालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे पुढे "आरोग्य" आणि "कोरोना" हे दोनच विषय महत्वाचे आहेत. त्यामुळे इतर जे काही अतिक्रमण, रस्ते, गटारी या कामाला तेवढे महत्व दिले जात नाही. अर्थात अहमदनगर च्या नागरिकांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही किंवा करत ही नाहीत. त्यामुळेच बाजार भरवण्याची परवानगी नसताना देखील अनेक ठिकाणी रोज बाजार भरतोच, पार्सल सुविधा च्या नावाखाली अनेक ठिकाणी नाष्टयाच्या गाड्या आणि हाॅटेल सुद्धा सुरूच आहेत. तिथं मात्र कोणत्याही नियमाचे पालन होत नाही. याला एकच कारण आहे, महापालिका प्रशासन यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी म्हणावी तशी प्रभागातील कर्मचारी करत नाहीत हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. त्यांना सुद्धा राजकीय आणि शासकीय संरक्षण कवच आहेच. आतां हेच पहा शहरातील लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्स याचे पालन केले नाही तर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन यांची आहे.तसेच इतर शहरातील लोक अहमदनगर शहरात दररोज येतातच त्यांना अटकाव करणे ही सुद्धा जबाबदारी महापालिका प्रशासन यांचीच आहे. याचेच उदाहरण मुंबई महापालिका ने दाखवून दिले आहे. बिहार पोलिस दलाचे आयपीएस पोलिस अधिकारी विनय तिवारी हे सुशांत सिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात तपासकामी मुंबई आले होते तर त्यांना सुद्धा मुंबई महापालिकेच्या अधिकारी यांनी कोरांनटाईन केले होते. याचाच अर्थ असा की महापालिका प्रशासन यांना खुप मोठ्या प्रमाणावर अधिकार आहेत हे पण सत्य आहे. आता तर महापालिका प्रशासन यांनी अत्यावश्यक सेवा वगळून काही दिवस महापालिका कार्यालय बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात महापालिका प्रशासन चे काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोविड-19 ची लागण झालेली आहे ही तशी दुर्दैवी घटना आहे, ते सर्वजण लवकर ठणठणीत बरे व्हावीत हिच ईश्वर चरणी प्रार्थना करुया. वास्तविक मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन जाहीर केला आहे. खरं तर त्याच वेळी शहरातील रस्ते चांगले करणे,तसेच अतिक्रमण काढणे, नाले गटारी साफसफाई करणे इ. कामे उरकून घेतली असती तर ऐन पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण झाला नसता. पण काय करणार, " आधीच कामाची हौस अन् त्यात पडला पाऊस " अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तर कोविड-19 च्या नावाखाली कोणतीच कामे होत नाहीत. तसेच शासकीय दवाखान्यातील सावळा गोंधळ सगळ्यांना माहिती झालाच आहे. सर्व सामान्य लोकांचा शासकीय यंत्रणा वरील विश्वास तेथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी फक्त हलगर्जीपणा केल्यामुळेच उडत चालला आहे. आता नगरसेवक श्री बाळासाहेब बोराटे यांनी एकाच शववाहिकेतुन बारा मृतदेह एकावर एक रचून ठेवलेली घटना उघडकीस आणली. त्यावर आता संबंधित दोषी कर्मचारी यांना महापालिका प्रशासन नोटीस देणार अशी बातमी वाचली आहे. वास्तविक मृतदेहाची अवहेलना करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे त्यामुळे नोटीस न देता डायरेक्ट गुन्हा का दाखल केला जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक मात्र निश्चितच आहेकी, शासकीय यंत्रणा एक दुस-याला कायमच पाठीशी घालत असते. यात मरण फक्त गोरगरीब सर्व सामान्य जनतेचे येतं. अहमदनगर शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे याचे कारण सुद्धा महापालिका प्रशासन यांची ढिम्म कार्यपध्दती आहे. एकीकडे महापालिका प्रशासन चे काही ठराविक अधिकारी व कर्मचारी, व्हिजीलन्स स्क्वाॅड चे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी काम करत आहेत त्यांचे आभार मानले पाहिजेत. तर दुसरीकडे काही कर्मचारी कामचुकारपणा करतातच हे पण सत्य आहे. त्यामुळे प्रथमतः अशा कामचुकारपणा करणारे कर्मचारी यांचेवर कारवाई केली पाहिजे. शहरात विनाकारण फिरणारे वाहने यांचे बाबतीत कडक कारवाई करून दंड आकारला पाहिजे असे वाटते. पण प्रत्येक गोष्ट किंवा कारवाई फक्त पोलिसप्रशासन यांनीच करायची नसते. आता जवळपास पाच सहा दिवस महापालिका बंद आहे, तेव्हा शहरातील मुलभुत प्रश्न मार्गी कसे लागतील यात लक्ष घालायला हवे. लवकरच गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र येत आहेत. त्या दृष्टीने सुद्धा शासकीय नियमाचे काटेकोर पालन कसे केले जाईल याकडे खुप लक्ष ठेवण्याची गरज आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य विकार आहे, त्यामुळे एकाच वेळेस एकाच ठिकाणी येऊन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती. मा. आयुक्त साहेब आपण थोडंसं कठोर होणं गरजेचं आहे. अहमदनगर सारख्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेल्या या शहरात कोविड-19 च्या काळात रूग्णांची व मृतदेहाची अशी अवहेलना होणे ही गोष्ट निश्चितच चांगली नाही. महापालिका प्रशासन त्यांचेकडून नागरिकांना चांगल्या आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात हिच माफक अपेक्षा आहे.
नागरिक हो अजुन ही भय संपले नाही. त्यामुळे आता आपणच आपली काळजी घेणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. प्रशासन यांचे आदेश आणि सूचना चे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद.
ॲड शिवाजी अण्णा कराळे
सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण