रांगोळी !! महत्व रांगोळीचे


रांगोळी !! महत्व रांगोळीचे

पुणे. विठ्ठल होले प्रतिनिधी:

 मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असे म्हणतात. रांगोळी ही मूर्तिकला आणि चित्रकला यांच्याही आधीची आहे. कुठल्याही धार्मिक किंवा मांगलिक कृत्यात रांगोळी आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट आहे. कोणत्याही सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, व्रत इत्यादि शुभप्रसंगी प्रथम धर्मकृत्याच्या जागी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. एखाद्याला किंवा एखादीला ओवाळतांना ती व्यक्ति बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात. समारंभाच्या भोजनप्रसंगीही पाटाभोवती व पानाभोवती रांगोळी काढतात.

 दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळया काढून त्या विविध रंगांनी भरतात. जुन्या काळी प्रत्येक घरी रोज दारापुढे सडासंमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती. रांगोळी शिरगोळयाच्या चूर्णाने काढतात. कोकणात भाताची फोलपटे जाळून त्यांची पांढरी राखही रांगोळी म्हणून वापरतात. रांगोळीचे पीठ सामान्यपणे जाडेभरडे असते. त्यामुळे चिमटीतून ते सहजपणे सुटते. जमीन सारवल्यावर तिच्यावर रांगोळीच्या चार रेषा न विसरता ओढल्या जातात. रांगोळी न घातलेली सारवलेली जमीन अशुभ समजतात.

 सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धि हे रांगोळीचे दोन उद्देश होत. रांगोळीत ज्या आकृत्या काढतात, त्या प्रतीकात्मक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची विशेष अनुभूति घडविते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतीके होत. रांगोळीच्या दोन समांतर रेषांच्या मध्यभागी दोन वक्र रेषा एकमेकींवर चढवून एक साखळी आकाराला आणतात. ही साखळी म्हणजे नागयुग्माचे प्रतीक असते. अष्टदल हे अष्टदिशात्मक विश्वाचे, तसेच सूर्य व विष्णु यांचे प्रतीक असते. कमळ हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून, वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळया धर्मकृत्यांत काढल्या जातात. यात मोठ्या चौकोनातले बारीक चौकोन विशिष्ट पद्धतीने, कुंकवाने भरून त्यांतून शिवलिंगाची आकृति निर्माण करायची असते. या रांगोळया शैव धर्माशी संबंधित आहेत. याशिवाय ठिपक्यांची रांगोळी या नावाचा आणखी एक रांगोळीप्रकार रूढ आहे. प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देऊन ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यांतून मोर, कासव, कमळ, वेल इत्यादि आकृत्या निर्माण करतात. ठिपक्यांची रांगोळी जटिल पण आकर्षक असते.

रांगोळी मुख्यत्वे स्त्रियाच काढतात. ती काढण्यासाठी त्यांना फूटपट्टी, दोरा, कुंचला इत्यादि कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नसते. त्यांची बोटे मुक्तपणे फिरून विविध आकृत्या सहजपणे निर्माण करतात. रांगोळीतल्या प्रत्येक आकृतीचा प्रारंभ तिच्या केंद्रातून होत असतो. रांगोळीचे आकृतिप्रधान व वल्लरीप्रधान असे मुख्य दोन भेद आहेत. आकृतिप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश या प्रदेशांत आढळते. तिच्यात रेखा, कोन आणि वर्तुळे ही प्रमाणबद्ध दिसतात. वल्लरीप्रधान रांगोळी भारताच्या पूर्व भागात आढळते. तिच्यात फूलपत्री, वृक्षवल्ली व पशु-पक्षी यांना प्राधान्य असते. अशी रांगोळी काढण्यात बंगाली स्त्रिया सिद्धहस्त आहेत. ही रांगोळी आकृतिप्रधान रांगोळीपेक्षा अधिक मोहक वाटते. श्री. आनंदघनराम रांगोळीचे तात्त्विक रहस्य विशद करतांना लिहितात की, जमिनीवर केरसुणी फिरवतांना किंवा सारवतांना जमिनीवर सूक्ष्म रेषा निर्माण होतात, त्यांत एकप्रकारचे कंपन असते. या रेखा अनियमित असल्याकारणाने त्यांचे कंपनही अनियमित असते; म्हणून ते शरीराला, नेत्रांना व मनाला हानिकारक असते. हे अनिष्ट कंपन टाळण्यासाठी सारवलेल्या जमिनीवर कोन आणि शुभ चिन्हे व्यवस्थित रूपाने रांगोळीच्या माध्यमाने काढली की झाडल्याचे व सारवल्याचे अशुभ परिणाम दूर होऊन शुभ परिणामांची प्राप्ती होते.

संदर्भ: सनातन संस्थेचे प्रकाशन ‘‘रांगोळी’’ आणि ‘‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News