" खाकी" तुन सुद्धा पाझरली "माणुसकी".. ॲड शिवाजी अण्णा कराळे


" खाकी" तुन सुद्धा पाझरली "माणुसकी".. ॲड शिवाजी अण्णा कराळे

"थोडंसं मनातलं".....

नमस्कार मित्रांनो , खरं तर पोलिस प्रशासन यांचे कडे बघण्याचा दृष्टीकोन  लोकांचा कधीच चांगला राहिला नाही परंतु लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने खरोखर जनता सुरक्षित रहावी म्हणून खुप चांगले काम केले आहे, त्याची दखल घ्यावी वाटली म्हणून आजच्या अर्टिकल मधून आज पोलिस दलाचे कौतुक करावे वाटते. मागील दोन वर्षापासून अहमदनगर मधील गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आले आहेत. कुठेही ताणतणाव निर्माण न होता अगदी सहजपणे मिरवणुका पार पडल्या याचे सर्व श्रेय अहमदनगर शहरातील लोकप्रतिनिधी, पत्रकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते,  सुजाण नागरिक, आणि पोलिस प्रशासन यांनाच जाते. पोलिस सुद्धा माणूसच असतो हे पोलिस प्रशासन यांनी केलेल्या कार्यातुन दिसुन आले.   

 अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनता सध्या कोविड-19 च्या महामारीला सामोरे जात आहे. संपूर्ण देशभर कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय आणि त्याची नगर जिल्ह्यात सुद्धा झळ बसली आहे. केंद्र सरकारने  आणि राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने 25 मार्च पासुन 31ऑगस्ट पर्यंत पाचव्यांदा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. अहमदनगर शहरातील कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात अहमदनगर मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा हात दिला आहे. जनता अडचणीत असताना अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासन तरी गप्प कसे बसणार? लाॅकडाऊन व संचारबंदी च्या सुरुवातीला जवळपास सर्वच उद्योग व्यवसाय आणि कामधंदा बंद असल्याने लोकांना घराबाहेर सुद्धा पडता येत नव्हते आणि कामधंदा बंद असल्याने रोजच्या जेवणाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला होता. लहान लहान मुलं उपाशी पोटी पानी पिऊन झोपत होती. अशा वेळी शहरातील अनेक गोरगरीब व वंचित लोकांच्या घरातील चूल ही पेटत नव्हती. या घटनांची माहिती अहमदनगर जिल्हा पोलीस प्रमुख श्री अखिलेश कुमार सिंह साहेब , अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ सागर पाटील साहेब आणि शहर विभागाचे पोलिस उपअधिक्षक श्री संदीप मिटके साहेब यांच्या निदर्शनास काही समाजसेवी लोकांनी आणून दिली आणि जिल्हा पोलीस दलाने लगेचच या घटनेची दखल घेतली. अहमदनगर शहरातील पंचवीस सामाजिक संस्था च्या माध्यमातून झोपडपट्टीत, दुर्गम भागात असलेल्या लोकवस्ती, दिव्यांग व्यक्ती, परित्यक्ता व विधवा महिला, तृतियपंथी लोकं, पारधी, मजूर, अंध अपंग व्यक्ती  बंजारा,लमाण समाज, गोंधळी समाज  यांच्यासह अनेक गरजवंत कुटुंब यांना जवळपास 7660 किराणा किट चे वाटप करून संकटकाळी मोठा आधार दिला. असे असले तरी अनेक लोकांना रोजगार नसल्याने दिलेले अन्न शिजवावे कसे हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला. त्याच वेळी अनेक कुटुंबातील लोकांनी पोलीसाना आपली व्यथा सांगितली. पोलिस दलाने भुकेल्या लोकांची भुक भागवण्यासाठी घर घर लंगर सेवा, आनंद धाम फौडेशन, समस्त जैन समाज, लाल टाकी सेवा मंडळ आणि बन्सी महाराज अन्नपुर्णा मंडळ यांचे माध्यमातून जवळपास 7 लाख 1 हजार 712 फूड पॅकेट दिले व अन्नदान केले. लाॅकडाऊन च्या काळात प्रवासाला बंदी असताना अनेक लोक आपापल्या गावी पायी चालत जात होते. तसेच काही रेल्वेने तर काही लोक बसने प्रवास करून आपापल्या गावी जात होते.अशा वेळी त्यांना जेवण व पाणी मिळत नव्हते. अहमदनगर पोलिस दलाने राजस्थान येथील 62 बस तसेच नऊ रेल्वे मधून प्रवास करणारे परराज्यातील 10419 प्रवाशी यांना फूड पॅकेट आणि पाणी दिले व त्यांची भुक भागवली. दिनांक 20 मे 2020 रोजी नगरच्या रेल्वे स्टेशनवर रात्री 12 वाजता अमृतसर येथे गेलेल्या 726 सोने व्यवसायीक व कारागीर यांना फूड पॅकेट आणि पाणी दिले. त्या बद्दल साता-याचे खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब यांनी पत्राद्वारे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले. अशाच प्रकारे कंटेनमेंट झोन व बफर झोन मध्ये अडकलेल्या मुक्या जनावरांना हिरवा घास दिला तर झोपडपट्टीत असलेल्या  गरजू व गोरगरीब महिलांना साबण, सॅनिटायझर, मास्क, सॅनिटरी नॅपकीन, शॅम्पु इत्यादी साहित्य देऊन "सखी कीट" चे वाटप केले. एवढ्यावरच पोलिस प्रशासन थांबले नाहीत तर एका दिड दोन वर्षे वयाच्या जळीत मुलाला स्वतः च्या गाडीत घेऊन बर्न हाॅस्पिटल येथे नेऊन उपचार केले तसेच या ऑनलाईन शिक्षण पध्दती मध्ये गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण घेणे कसे शक्य होईल हे पाहून   वाड्या, वस्त्या, तांडे, झोपडपट्टीतील मुले यांना शालेय शैक्षणिक साहित्य पुरविले. इतकेच नव्हे तर लाॅकडाऊन  अगदी सुरवातीचे काळात शहरातील मुकुंदनगर हा भाग हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केला होता. त्यामुळे येथील लोकांना जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा मिळत नव्हत्या. तसेच तेथील सुजाण नागरिक आणि पत्रकार बांधव यांनी एटीएम ची व्यवस्था केली पाहिजे अशी सुचना पोलिस प्रशासन यांना केली. पोलिस प्रशासन यांनी एचडीएफसी बॅंक अधिकारी यांचे सोबत चर्चा करून मुकुंद नगर मध्ये एटीएम ची सेवा उपलब्ध करून दिली. या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार केला तर एक पोलिस सुद्धा माणूसच आहे हे याची जाणीव होते.जनतेला पोलिस म्हटले की कायमच भ्रष्टाचारी पोलिस दिसतो व त्यांची कायम वाईट प्रवृत्तीच दिसते. पण पोलिस सुद्धा माणूस आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. कोविड-19 च्या काळात दिवसभर आपल्या कुटुंबियांना सोडून व मुलाबाळाची पर्वा न करता पोलिस आपल्या संरक्षणासाठी ड्यूटी करतात ही जाणीव असू द्या हिच अपेक्षा. अनेक पोलिस कोरोना चे बळी ठरले आहेत. कधी कधी पोलीसांना कठोर भूमिका घ्यावीच लागते. आता जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नका असे वेळोवेळी सांगितले पण जनता ऐकायला तयारच नाही, शेवटी पोलीसीखाक्या दाखवावाच लागला. संचारबंदी च्या काळात जवळपास 11500 गुन्हे पोलिस प्रशासन यांनी दाखल केले आहेत. एवढ्यावरही पोलिस प्रशासन थांबले नाहीत तर, आयोग्य मार्गी होणारी दारू वाहतूक करणारे आरोपी यांना पकडले व गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नियमाचे उल्लंघन करणारे बेजबाबदार लोकांना दंड करून कायदेशीर कारवाई केली. एकदा तर रात्री 11.30 वा जिल्हाधिकारी श्री राहुल द्विवेदी साहेब हे स्वतः च्या खासगी गाडीतुन अहमदनगर शहरातील बंदोबस्त परिस्थिती ची पहाणी करत असताना कोठला चौकात आले असता पोलिस उपअधिक्षक श्री संदीप मिटके साहेब यांनी त्यांचीच गाडी अडवली. जेव्हा जिल्हाधिकारी साहेब गाडीतून उतरले तेव्हा त्यांनी श्री संदीप मिटके साहेब यांचे कौतुक केले. लाॅकडाऊन च्या काळात अनेक महापुरूषांच्या जयंती इ उत्सव आले. तसेच सणउत्सवाला सुरूवात झाली. सर्व धर्मियांचे धार्मिक स्थळे पुर्ण पणे बंद आहेत. त्यामुळे लोकांनी सणउत्सव घरीच साजरे केले. त्यामुळे पोलिस प्रशासन यांनी सर्व धर्मियांचे घरी जाऊन स्वागत केले आणि मिठाईचे वाटप करून नवा आदर्शच निर्माण केला आहे. खरं सांगायचं तर कोरोना माहामारीचे काळात आपला जवळचा नातेवाईक सुद्धा आपल्या जवळ फिरकत नाही. अनेक वेळा अंतयात्रेत सुद्धा नातेवाईक न आल्याने पोलिसांनीच अंत्यसंस्कार केले आहेत हे सुद्धा नाकारता येणार नाही. आपण नेहमीच पोलिस प्रशासन ला दोष देऊन मोकळे होतो. परंतु त्यांच्या परिस्थितीचा आपण सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची घटना घडली की आपल्याला प्रथमतः पोलिस स्टेशनच दिसते. सर्वच पोलिस वाईट नसतात, फक्त पोलिस दलातील काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे सर्व पोलिसदल बदनाम होते. परंतु आपण सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. "दिलासा सेल" च्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती जयश्री काळे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी पोलिस स्टाफ ने लाॅकडाऊन च्या काळात घरगुती छळ होत असलेल्या अनेक पिडित महिलांना मदत केली व त्यांचे प्रश्न मार्गी लावले. आता फक्त जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी प्रत्येक पोलिस स्टेशन ला जसे महिला तक्रार निवारण केंद्र आहे तसेच  "पुरूष समोपदेशन सेंटर" सुरू करावेत हिच अपेक्षा आहे.  तसेच एलसीबी चे पोलिस निरीक्षक श्री दिलीप पवार, श्री संदीप पाटील यांनी अनेक गुन्ह्यांचे तपास करून आरोपी अटक केले. सायबर पोलिस ने सुद्धा लाॅकडाऊन च्या काळात अनेक फसवणूक झालेली गुन्हे उघडकीस आणली आहेत.  अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात खरोखर कौतुकास्पद कामगिरी केली आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंह साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ सागर पाटील साहेब, पोलिस उपअधिक्षक श्री संदीप मिटके साहेब, कोतवाली पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक   श्री प्रवीण लोखंडे साहेब , तोफखाना पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री मुलाणी साहेब, भिंगार कॅम्प चे श्री प्रवीण पाटील साहेब , नगर तालुका पोलिस स्टेशन चे श्री शंकरसिह राजपूत साहेब  आणि एमआयडीसी चे पोलिस निरीक्षक श्री बोरसे साहेब  व उपनिरीक्षक श्री सुपनर साहेब तसेच महिला पोलिस अधिकारी आणि सर्व पोलिस पुरूष व महिलां  कर्मचारी याचे आभार मानावेत तितके थोडे आहे. लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळातील पोलिस प्रशासन यांनी केलेले या सर्व कामाचा विचार केला तर "खाकी" तुन सुद्धा पाझरली "माणुसकी" हे म्हणणं योग्य आहे असे वाटते आहे. शहराचे आमदार श्री संग्राम भैय्या जगताप, स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधी,  सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था, पत्रकार मंडळी यांनी सुध्दा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना कोविड-19 आटोक्यात आणण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे म्हणून या सर्वांना व अहमदनगर जिल्हा पोलीस दलास धन्यवाद. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही. कृपया आपण शासकीय नियमाचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News