जेष्ठ संपादक व निर्भीड पत्रकार मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रातील आधारवड हरपला-महसूल मंत्री नामदार थोरात


जेष्ठ संपादक व निर्भीड पत्रकार मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र क्षेत्रातील आधारवड हरपला-महसूल मंत्री नामदार थोरात

शिर्डी, राजेंद्र दूनबळे, (प्रतिनिधी)

छोट्या खेडेगावातून आलेल्या पुण्यभूषण मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी पुण्यनगरी या लोकप्रिय वृत्तपत्रासह मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड भाषेत सुरू केली वृत्तपत्रे मोठी लोकप्रिय ठरली आहे. वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत निर्भीड पत्रकारिता करणारे वृत्तपत्र क्षेत्रातील महर्षी स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील आधारवड हरपला असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.            जेष्ठ पत्रकार व पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत महसूल मंत्री थोरात बोलत होते. स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडीसारख्या छोट्या गावातून आपल्या कार्यास प्रारंभ केला. वेळप्रसंगी उपाशी राहून फुटपाथवर राहून त्यांनी दिवस काढले. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समूहाचे मालक अशी त्यांची कामगिरी नेत्रदीपक आहे. सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत साधी राहणी व उच्च विचार असलेल्या बाबांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरात ,कर्नाटक अशा विविध भाषांमधून आपली वृत्तपत्रे सुरु केली. पुण्यनगरी, हिंदमाता, मुंबई चौफेर, वार्ताहर, कर्नाटक  मल्ला ही त्यांची वृत्तपत्रे मोठी लोकप्रिय ठरली आहे.


            वयाच्या 83 व्या वर्षापर्यंत शिंगोटे बाबा यांनी राज्यभर प्रवास करून हे वृत्तपत्र वाढवण्यात मोठे काम केले. अखेरपर्यंत निर्भीडपणे त्यांनी आपली लेखणी चालविली. ग्रामीण भागातून आलेल्या व कोणत्याही पत्रकारितेचा वारसा नसलेल्या या व्यक्तिमत्वाने पत्रकारिता क्षेत्रात अनेक नवीन पत्रकारांसाठी आधारवड म्हणून काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पुण्यभूषण पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ समीक्षक, संपादक व निर्भीड पत्रकार हरपला असून पत्रकारिता क्षेत्रातील महर्षी असलेल्या स्वर्गीय मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे


जाहिरात
Search
विडिओ
Recent News