अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रॉपर्टीच्या कारणावरुन पिळवणूक होत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण देण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे. तर प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांचा छळ करणार्यांना कोरोनासूर घोषित करण्यात आले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
कोरोनाच्या संकटकाळात न्यायाधीश ज्युडिशियल कॉरंनटाईन झाले. सर्वसामान्यांना न्यायालयाची दारे बंद झाल्याने कायद्याचे राज्य संपुष्टात आले. कोरोनाच्या भितीमुळे सर्वजण पळ काढत आहे. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी मात्र आपले कर्तव्य बजावण्याची वेळ आहे. कोरोनामुळे ज्येष्ठ व्यक्ती मृत्यूमुखी पडत आहे. त्यांना संक्रमण होण्याचा धोका अधिक असताना, त्यांची काळजी घेण्याऐवजी अनेक कुटुंबात प्रॉपर्टीच्या कारणावरुन त्यांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबातील मुले, मुली, सून व जावई प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी प्रयत्नशील असून, यासाठी त्यांनी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची पिळवणूक सुरु केली आहे. या प्रकरणाकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. नगर-कल्याण रोडवरील लताबाई अरुण कडव या ज्येष्ठ महिलेस त्यांचे जावाई व मुलीने प्रॉपर्टीवरुन त्रास देण्यास सुरुवात केली आहे. लताबाईनी आपल्या पतीच्या निधनानंतर मोठ्या कष्टाने पाने, फुले विकून प्रॉपर्टी कमवली. त्यांनी दोन ठिकाणी जागा विकत घेतली. आपल्या मुलीला व जावाईला राहण्यासाठी छत्र दिले. मात्र एक प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी सदर जावाई व मुलगी त्यांच्या जीवावर उठले असल्याची तक्रार लताबाई यांनी संघटनेकडे केली आहे. ही प्रॉपर्टी सोडून जाण्यासाठी किंवा नावावर करण्यासाठी त्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली आहे. लताबाईंनी पोलीसात तक्रार केली मात्र पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रॉपर्टीसाठी आई-वडिलांना त्रास देणारे कोरोनासूर असून, हे कोरोनासूर संपविण्यासाठी पोलीसांनी पुढाकार घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.