छत्रपती कारखान्याच्या इतिहासात नवा अध्याय रचला जाणार ; 17 वर्षानंतर पवार - जाचक डिनर डिप्लोमसी!


छत्रपती कारखान्याच्या इतिहासात नवा अध्याय रचला जाणार ; 17 वर्षानंतर पवार - जाचक डिनर डिप्लोमसी!

इंदापूर, काकासाहेब मांढरे प्रतिनिधी:

सतरा वर्षांपूर्वी शरद पवार यांचा शब्द हा पृथ्वीराज जाचक यांच्यासाठी प्रमाण असायचा.. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.. सतरा वर्षांपूर्वी हेच घडले जेव्हा एका छोट्याशा राजकीय स्थित्यंतरात जाचक पवार यांच्यापासून कायमचे दुरावले… पण 17 वर्षानंतर 28 हजार सभासदांच्या प्रपंचाच्या चुलीसाठी जाचक यांनी टाकलेले पुढचे पाऊल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील आपलेसे केले आणि आज 17 वर्षानंतर ऋणानुबंधाच्या गाठी पुन्हा जुळून आल्या….सुमारे दीड तासाची डिनर डिनर डिप्लोमसी छत्रपती कारखान्याच्या रक्षाबंधनाचा मुहूर्त ठरला…! आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ किरण गुजर यांच्या पुढाकारातून राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक कुणाल जाचक हे देखील उपस्थित होते. श्री शरद पवार व जाचक कुटुंबीय यांनी आज एकत्रित जेवण घेतले आणि सहकारातील सहकार्यासाठी जाचक यांचे पाऊल आणखी पुढे पडले.गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती सहकारी साखर कारखान्यातील जाचकांचा सत्तेतील प्रवेश मागे पडतो की काय अशी शंका कार्यक्षेत्रातील सभासदांना आलेली होती परंतु आज दुपारी झालेल्या डिनर डिप्लोमसी मुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या यापुढील आयुष्यात सहकारातील सहकार्याचा नवा पायंडा पडेल असे संकेत पुन्हा एकदा मिळाले आहेत. तब्बल 17 वर्षे विरोध केलेल्या जाचक यांना पुन्हा आपल्याबरोबर घेण्यासाठी अजित पवार यांनी सकारात्मक संकेत दिले होते, तसेच पृथ्वीराज जाचक यांनीदेखील छत्रपती सहकारी साखर कारखाना अधिक प्रगतिशील वाटेवर नेण्यासाठी आपण हा सहकार्याचा हात पुढे करीत आहोत असे स्पष्ट करीत सतरा वर्षाचा विरोध संपवण्याचे संकेत दिले होते, मात्र मध्यंतरी पुन्हा त्यामध्ये खंड पडला होता. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासदांमध्ये हे राजकीय हस्तांतर होणार की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. तो आजच्या बैठकीने मोडीत निघाला. दरम्यानच्या या बैठकीविषयी जाचक यांना विचारले असता आमची ही सदिच्छा बैठक होती. किरणदादा गुजर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता, बैठक खूप सकारात्मक झाली. यामध्ये साखर उद्योगावरील सर्व प्रश्न साहेबांच्या कानावर घातले व यामध्ये अनेक विषयावर सखोल चर्चा झाली असे सांगितले. दरम्यान छत्रपती कारखान्यासंदर्भात नेमकी काय चर्चा झाली असे विचारले असता ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी मात्र सूचक मौन बाळगले व खूप सकारात्मक चर्चा झाली एवढेच उत्तर दिले. अर्थात या डिनर डिप्लोमसीने छत्रपती कारखाना च नव्हे तर इंदापूर तालुक्यातही वेगवेगळे राजकीय व सामाजिक बदल घडतील असे संकेत मिळत आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News