शिर्डीः- राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी तसेच नाटय् रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने दरवर्षी श्रावण शुध्द प्रतिपदेपासून सुरू होणारा श्री साईसच्चरित पारायण सोहळा यावर्षीपासून गोकुळाष्टमीच्या अगोदर श्रावण वद्य १ पासून म्हणजेच दिनांक ०४ ऑगस्ट २०२० पासून आयोजित करण्यास तदर्थ समितीने मान्यता दिली आहे. तथापि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही उत्सव आभासी (Virtual) पध्दतीने साजरे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
श्री.ठाकरे म्हणाले, सध्या संपुर्ण भारतात कोरोना या साथीच्या रोगाचा प्रादूर्भाव असल्याने यावर्षी २६ वा श्री साईसच्चरित पारायण सोहळा आभासी (Virtual) पध्दतीने साजरे करण्यात येणार आहे. श्री साईसच्चरित पारायणाचे वाचन हे दिनांक ०४ ऑगस्ट ते दिनांक १२ ऑगस्ट २०२० या कालावधीत सकाळी ०७.०० ते ११.०० यावेळेत संस्थान पुजा-यांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच यावेळेत पारायण वाचनाचे युट्युब (Utube) - https://www.youtube.com/watch?v=ZONrEHev-xg, फेसबुक पेज (Facebook Page) - https://www.facebook.com/shrisaibabasansthantrustshirdi/ व वेबसाईट (website) - www.sai.org.in या लिंकवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे सांगुन सर्व साईभक्तांनी आपल्या घरीच यावेळेत पारायण वाचन करावे असे आवाहन ही श्री.ठाकरे यांनी केले.