" जिल्हा प्रशासनाने काही जाचक अटी शर्तीवर पुनर्विचार करायला हवा" ॲड शिवाजी अण्णा कराळे


" जिल्हा प्रशासनाने काही जाचक अटी शर्तीवर पुनर्विचार करायला हवा"   ॲड शिवाजी अण्णा कराळे

थोडंसं मनातलं...

नमस्कार मित्रांनो 

अहमदनगर जिल्ह्यातील कोविड-19  ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी कोविड-19 चे सेंटर सुरू केले आहेत. आणि त्याचाच परिणाम म्हणुन अनेक रूग्ण बरे झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. आता सरकारने 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लाॅकडाऊन वाढवला आहे. तसेच अनलाॅकडाऊन भाग तीन मध्ये खुपच मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. अर्थात जनतेच्या अडचणी सुटाव्यात म्हणून सरकारने व जिल्हा प्रशासन यांनी खुपच चांगले पाऊल उचलले आहे, त्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले पाहिजेत. परंतु जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी लाॅकडाऊन व संचारबंदी च्या काळात काही जाचक अटी शर्ती घातल्या आहेत. वास्तविक त्या अटी शर्तीचे किती प्रमाणात पालन होते आणि किती पळवाटा काढल्या जातात हा संशोधनाचा विषय आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी आता काल परवा अहमदनगर चे जिल्हाधिकारी श्री राहुल द्विवेदी साहेब यांनी 1 ऑगस्ट 2020 पासुन 31 ऑगस्ट 2020 पर्यंत चे काही आदेश जारी केले आहेत. तसेच पोलिस प्रशासन यांनी सुध्दा यापुर्वीच काही आदेश जारी केले आहेत. वास्तविक पहाता जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी कठोर भूमिका घेतली आहे याचे स्वागत केलेच पाहिजेत. जिल्हा प्रशासन यांनी कालच्या आदेशात दुचाकी वाहनांना 1+1 अशी परवानगी दिली आहे, परंतु त्या सोबतच "हेल्मेटची" सक्ती केली आहे. हा निर्णय थोडंसा गोरगरीब आणि सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोकांना त्रास दायक ठरू शकतो. कारण सध्याची परिस्थिती पहाता लोकांना अर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत हे पण सत्य आहे, अशा परिस्थितीत आता पुन्हा हेल्मेट घेणे खर्चिक आहे. तसेच अगोदरच तोंडावर मास्क आणि त्यावर पुन्हा हेल्मेट घातले तर आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते.  लोकांना श्वाच्छोश्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो. तसेच आता सरकारने सर्व व्यवहार व व्यवसाय खुले केले आहेत. त्यामुळे अनेक गोरगरीब व कामगार लोकांना आताच कुठे तरी रोजगार उपलब्ध झाला आहे त्यामुळे सध्या तरी हेल्मेट सक्तीचा निर्णय कमीत कमी अहमदनगर महापालिका चे हद्दीत तरी शिथील करण्याचा पुनर्विचार करायला हवा असे वाटते आहे. तसेच पोलिस प्रशासन यांनी सुध्दा अहमदनगर जिल्ह्याचे बाहेरील जिल्ह्यातील एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक यांना अंत्यसंस्कारा साठी जायचे असेल तर मयत व्यक्तीचा "मृत्यूचा दाखला" दिला तरच जाण्यासाठी पास दिला जाईल असे जाहीर केले आहे. वास्तविक पहाता अशा अघटित घटना पुर्व सुचना देऊन घडत नसतात. तसेच  एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचा मृत्यू दाखला मिळण्यासाठी एकवीस दिवस लागतात. अशा परिस्थितीत रात्रीअपरात्री जर अशा घटना घडल्या तर मृत्यू चा दाखला कसा द्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता अशा परिस्थितीत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोबाईल फोन वरून घडलेल्या घटनेची शहनिशा करून नागरिकांना जाण्यासाठी परवानगी दिली पाहिजे असे वाटते. आता तर जिल्हा बंदी घातली असताना सुद्धा बाहेरचे जिल्ह्यातील अनेक लोक अहमदनगर शहरात दररोज येतातच. तसेच "ई पास" एजंट मार्फत कशा प्रकारे दिले जातात याबद्दल वर्तमानपत्रात सविस्तर छापून आले आहे. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमाचे किती बेजबाबदार लोकांनी उल्लंघन केले आहे ही बाब सुद्धा समोर आली आहे. वास्तविक पहाता ज्या लोकांच्या शासकीय आणि राजकीय ओळखी आहेत त्यांचेकडूनच आदेश पायदळी तुडवले गेले आहेत हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. महापालिका प्रशासन यांची परवानगी नसताना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला बाजार भरलाच जातोच. आता जिल्हा  प्रशासनाने हा विचार करणे आवश्यक आहे की, कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायचाय की हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून "दंड" वसूल करायचाय हे प्रशासनाने ठरवायचे आहे. परंतु काही अटी शर्ती या सर्व सामान्य जनतेला खरोखरच त्रास दायक आहेत याचा जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी नक्कीच पुनर्विचार करायला हवा हि विनंती आहे.

सध्या अहमदनगर शहरात कोविड-19 चा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच अजुनही जनजीवन सुरळीतपणे चालु झाले नाही. त्यामुळे अगोदरच सर्व सामान्य जनता हैराण झाली आहे तशातच आता अधिक खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन यांनी या सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, कारण जिल्हा प्रशासन च्या काही "जाचक व तुघलकी" निर्णयाची समाजमाध्यमावर अक्षरशः "जोक्स" म्हणून खिल्ली उडवली जात आहे याचे खुपच वाईट वाटते. खरं तर सध्या कोविड-19 ला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने व जिल्हा प्रशासन यांनी खुपच चांगले काम केले आहे यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही, त्यासाठी शासकीय आदेश व सूचनांचे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर या त्रिसुत्रीनेच कोविड-19 आटोक्यात येऊ शकतो. विनाकारण कोणत्याही आफवाना बळी पडू नये हि विनंती आहे, तसेच काही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये हि विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. 

धन्यवाद. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जाहिरात
Search
विडिओ
Recent News