अण्णाभाऊंना भारतरत्न ने सन्मानित करा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मोहीम


अण्णाभाऊंना भारतरत्न ने सन्मानित करा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मोहीम

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

शुन्यातून विश्व निर्माण करणारे लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशा मागणीचा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने एकमताने संमत केला आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा, या मागणी साठी पक्षाच्यावतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची मोहिम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य सहसचिव ॲड.सुभाष लांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती घेतल्यास त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.  विशेष म्हणजे त्यांचे सर्व साहित्य तळगाळातील "नाही रे" वर्गाला, महिला अन् दलित, आदिवासींना प्रेरणा देणारे आहे.  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाची भागिदारी केली आहे. शाहीर अमरशेख व शाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीने मुंबईसह अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. साहित्याच्या क्षेत्रात अण्णाभाऊंनी जवळपास 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 3 नाटके, 14 लोकनाट्ये, 10 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि कितीतरी शाहीरी कवने लिहून एक वेगळाच इतिहास घडविला आहे. त्यांच्या कादबंरी लेखनावर 7 मराठी चित्रपटही निघाले आहेत. शिक्षणाची परंपरा नसलेल्या, आर्थिक-सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या मातंग समाजातील अण्णाभाऊंनी आपल्या भोवतालच्या अनुभवाच्या आणि प्रतिभेच्या सामर्थ्यावर दिलेले समाजासाठीचे योगदान लक्षात घेता, केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या 101 व्या जयंती वर्षात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे, असा ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने संमत केला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारच्यावतीने केंद्राकडे याबाबत खंबीरपणे शिफारस करावी, अशी मागणीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकावर पक्षाचे राष्ट्रिय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, राज्याचे सचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्य सहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, कॉ. नामदेव गावडे, सचिव मंडळाचे सदस्य कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. राजू देसले, कॉ. प्रा. राम बाहेती, कॉ. स्मिता पानसरे, सूकुमार दामले यांच्या सह्या आहेत.

- लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शनिवारी ( दि. १ ऑगस्ट ) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या वतीने राज्यातील व जिल्हयातील कार्यकर्ते शक्य असेल तेथे अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून  तसेच घरोघरी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करणार असल्याचे ॲड. सुभाष लांडे यांनी सांगीतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News