"थोडसं मनातलं" "नगरी कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा" .. ॲड शिवाजी कराळे


"थोडसं मनातलं"   "नगरी कोरोना योद्ध्यांना मानाचा मुजरा" .. ॲड शिवाजी कराळे

नमस्कार मित्रांनो 

आपला भारत देश जेव्हा जेव्हा संकटात येतो तेव्हा तेव्हा भारतातील जनता त्याचा सामना करण्यासाठी तयार असते. मग भारतावर झालेले चिनी व पाकिस्तान चे आक्रमण असेल किंवा संसदेत आणि मुंबई वर झालेले अतिरेकी हल्ले असोत, अनेक मनुष्य हानी करणारा किल्लारीचा भूकंप असो किंवा जवळपास चार पाच हजार लोकांचा बळी घेणारी भोपाळ ची वायुगळतीची घटना असो, भारतातील माणूस हा कायमच देशासाठी एकजूट झालेला आपण पाहीले आहे.आता कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण देशभर थैमान घालतोय. अशा वेळी कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी व आटोक्यात आणण्यासाठी  राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने अनेक  उपाययोजना सुरू केल्या आहेत. जरी कोविड-19 ची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रूग्ण ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे.  

अचानक आलेल्या संकटकाळी मदत करण्यासाठी भारतीय माणूस सुद्धा कमी पडला नाही. भारतातील अनेक दानशूर व्यक्तीनी करोडो रुपयांचा निधी सरकारला उपलब्ध करून दिला आहे. अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध चित्रकार श्री प्रमोद कांबळे सर यांनी तर ज्या व्यक्तीने, कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी साठी सरकारला पाच हजार रूपये मदत केली त्याचे "फोटोस्केच" मोफत काढून दिले व सरकारला मदत केली. अनाथ मुलं मुली सांभाळत त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणा-या "सावली संस्थेचे"  नितेश बनसोडे यांनी सुध्दा आपल्या "घासातला घास " गोरगरीब लोकांना दिला. अगदी अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील पहायचे असेल तर राज्यसरकार जेवढे प्रयत्न करीत आहेत तेवढेच प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील सामाजिक संघटना, संस्था, समाजसेवक, पोलिस अधिकारी आणि जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, डाॅक्टर आणि नर्स, सफाई कर्मचारी, शिक्षक मंडळी हे प्रयत्न करताना दिसतात. खरं तर अहमदनगर च्या कोरोना योद्धे यांना खरंच मनापासून सलाम केलाच पाहिजे. 25 मार्च पासुन संपूर्ण देशभर लाॅकडाऊन जाहीर केला. आता तो राज्यसरकारने 31 ऑगस्ट पर्यंत वाढवला आहे. सगळ्यात प्रथम गोरगरीब जनतेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा "घर घर लंगर सेवा " चे माध्यमातून आता पर्यंत जवळपास पाच लाख गरजू व गोरगरीब लोकांना श्री हरजीतसिंग वाधवा आणि त्यांचे सहकारी यांनी जेवण पुरविले. तसेच अहमदनगर महापालिका यांनी "कम्युनिटी किचन" च्या माध्यमातून स्थलांतरीत कामगार आणि कोरांनटाईन केलेल्या लोकांना जेवण आणि औषधं पुरविले. यामध्ये महापालिका प्रशासन चे उद्यान विभागाचे अधिकारी श्री शशिकांत नजान सर (भाई) आणि इतर सर्व अधिकारी दिवसरात्र मेहनत घेत होते. जसे जसे कोविड-19 चा प्रसार वाढायला लागला तसे तसे लोकांना चांगले उपचार मिळावेत या शुध्द हेतुने   अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी एकत्र येऊन आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांचे पुढाकारातुन आयुर्वेद काॅलेजचे गुणे हाॅस्पिटल येथे "गुरूआनंद" या नावाने कोविड-19 सेंटर सुरू केले. तसेच महापालिका प्रशासन यांनी सावेडी उपनगरात आनंद लाॅन येथे 100 खाटांचे कोविड-19 चे सेंटर सुरू केले आहेत. आता शासकीय तंत्र निकेतन बुरूडगाव रोड येथे अहमदनगर मधील सुप्रसिद्ध रंगकर्मी व रोटरीचे अध्यक्ष श्री क्षितिज झावरे, श्री प्रसन्न खाजगीवाले, श्रीमती गिल्डा ताई व त्यांचे सर्व रोटरीचे शाखेचे अधिकारी आणि पदाधिकारी  सहकारी आणि "आय लव्ह नगर" यांनी मिळून महापालिका प्रशासन यांचे सहकार्य घेऊन 120 खाटांचे कोविड-19 चे सेंटर सुरू केले आहेत. अहमदनगर मधील सुप्रसिद्ध डाॅक्टर मंडळी यांनी सावेडी रोडवर जुने दिपक हाॅस्पिटल व एम्स हाॅस्पिटल येथे कोविड-19 चे खाजगी हाॅस्पिटल सुरू केले आहेत. तसेच अहमदनगर च्या नाट्य परिषदेने सुद्धा नगर मधील कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. आजही अनेक कोरोना योद्धे वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासनास मदत करीतच आहेत, आणि याचाच परिणाम म्हणुन अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. परंतु दुर्दैवाने काही बेजबाबदार  जनता शासकीय नियमाचे उल्लंघन करतात आणि त्यामुळेच कोरोना लवकर आटोक्यात येण्यासाठी अडचणी निर्माण होतात. आता केंद्र  सरकार ने अनलाॅकडाऊन भाग 3 जाहीर केला आहे. या मध्ये बरीचशी शिथिलता आणली जाऊ शकते. परंतु अजुनही कोविड-19 चे भय कमी झाले नाही. त्या साठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. लाॅकडाऊन च्या काळात अनेक व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे तरीही अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते लोकांना मदत करण्यासाठी स्वतः होउन पुढे येत आहेत. खरंच त्यांना सलाम केलाच पाहिजे. अगदी पोलिस प्रशासन सुद्धा दिवसभर काम करून सुद्धा ज्यांना अन्न नाही त्यांची काळजी घेताना दिसतात. अहमदनगर शहरात काही सामाजिक संस्था तर गेल्या चार पाच महिन्यांपासून  अन्नदान करतात. तसेच शहरातील लोकप्रतिनिधी, अनेक शासकीय अधिकारी, पत्रकार मंडळी, सफाई कर्मचारी, शिक्षक मंडळी, डाॅक्टर आणि नर्स  हे आपला जीव धोक्यात घालून गरीब जनतेला मदत करताना दिसतात. या सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था यांनी फक्त माणूसपण एवढंच जपलेले दिसत आहे. कोविड-19 च्या  संकटांना सामोरे जाताना महापालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सतर्क आहे. प्रशासन  अनेक समाज माध्यमातून कोरोना प्रदुर्भाव टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी या बाबतीत जनजागृती करत आहेत. तसेच नागरिकांनी सुद्धा याची काळजी घ्यावी हि विनंती आहे. खरंच अजुन ही माणुसकी जिवंत आहे.  सलाम तुमच्या जनसेवेला. अहमदनगर च्या या सर्व "नगरी कोरोना योद्धयांना" आमचा मानाचा मुजरा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 

सदस्य सदस्य जिल्हा विधी सेवा.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News