शेवगा़व प्रतिनीधी सज्जाद पठाण
सर्वसमावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन चाकी सायकलचे वाटप सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या हस्ते झाले. समवेत, गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड व इतर.
शेवगाव दिव्यांग विद्यार्थ्यांना गरजेनुसार व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी व अर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले.
शेवगाव पंचायत समितीच्या प्रांगणात मंगळवारी ( दि. २८ ) शिक्षण विभागाच्या वतीने समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्वावर अॅलिम्को साहित्याचे वाटप डॉ. घुले यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड आदी उपस्थित होते.
तालुक्यातील ८७० लाभार्थी विद्यार्थ्यांची तपासणी वैद्यकिय अधिका-यांमार्फत झाली होती. त्यातील साहित्याच्या गरज असलेल्या ३९ विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हील चेअर, तीन चाकी सायकल, कमोड चेअर, रोलेटर, श्रवण यंत्र, एमआर कीट आदी अॅलिम्को साहित्य पंचायत समिती मार्फत मंजूर झाले आहे. त्यातील दोन विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात साहित्याचे वाटप डॉ. घुले यांच्या हस्ते झाले.
डॉ. घुले म्हणाले, दिव्यांग विद्यार्थी हे समाज व राष्ट्राचे एक घटक असून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. समाजात अभिमानाने जीवन जगण्याची संधी त्यांना उपलब्ध करुन दिली पाहीजे, गटशिक्षणाधिकारी कराड म्हणाले, दिव्यांग विद्यार्थी हा समाजाचा भाग असल्याने त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. सध्याच्या कोविड १९ आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणास्तव उर्ववरित विद्यार्थ्यांना लगेचच घरपोहच साहित्यांचे वाटप केले जाणार आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनंत शिनगारे, अशोक तोरडमल, बाळासाहेब पालवे, पांडूरंग खरड, मधुकर घुले, संतोष ढाकणे यांनी प्रयत्न केले. प्रास्तविक विशेषतज्ञ महेश राऊत यांनी केले. तर विषयतज्ञ त्रिंबक फपाळ यांनी आभार मानले.