थोडंसं मनातलं..... "दुखतंय टोणग्याचं अन् इंजेक्शन पखालीला".. ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडंसं मनातलं..... "दुखतंय टोणग्याचं अन् इंजेक्शन पखालीला".. ॲड शिवाजी अण्णा कराळे

थोडंसं मनातलं.....

"दुखतंय टोणग्याचं अन् इंजेक्शन पखालीला".. ॲड शिवाजी अण्णा कराळे 

नमस्कार मित्रांनो 

मी "थोडसं मनातलं" हे सदर लिहून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि जनजागृती करत आहे. माझा फक्त समाजातील वेगवेगळ्या समस्यां शब्दबद्ध करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हाच एकमेव उद्देश आहे.  या मध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा, बदनामी करण्याचा, कुणाला ही ट्रोल करण्याचा माझा कधीच हेतु नव्हता व नाही. तसेच मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही तसेच प्रशासनाचा प्रवक्त्ता पण नाही. या भावना माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत म्हणून मी त्या शब्दात मांडतोय.  सध्या कोविड-19 देशात थैमान घालतोय आणि त्याची झळ संपूर्ण देशभर बसली आहे .आज थोडं राजकीय विषयाला हात घातला आहे. देशात 25 मार्च पासुन 31 जुलै पर्यंत टप्प्याटप्प्याने पाचव्यांदा लाॅकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक लोक घरीच बसुन आहेत. एकीकडे जनता सुरक्षित रहावी म्हणून कोरोना योद्धे आपला जीव धोक्यात घालून कामं करत आहेत तर दुसरीकडे राजकीय पक्षांचा कलगीतुरा चालु आहे. देशात राजकीय पक्षांचे नेते मंडळी यांचे आवक जावक हे काही नवीन नाही. महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारे अनेक घटना घडल्या आहेत. पुर्वी एकमेकांना कायमच विरोध करणारे नेते मंडळी आता एकत्र सरकार मध्ये सामील झाले आहेत आणि मांडीला मांडी लावून बसलेली बघायला मिळतंय. तीच परंपरा अगदी ग्रामपंचायत, सोसायटी, कारखाना या पातळीवर येऊन ठेपली असल्याचे जाणवते. कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी  एकमेकांचे डोके फोडतात, नातीगोती विसरतात आणि एकदिवस राजकीय नेतेच स्वार्थी होऊन पक्षांतर करतात हे चित्र सर्रासपणे पहायला मिळते. त्यावेळी ज्यांना आपण शिव्याशाप दिले त्यांचे सोबतच काम करणे गरजेचे आहे हे कार्यकर्त्यांना जाणवायला लागते. त्यामुळे राजकारणात फार काळ कुणी कुणाचा शत्रू नसतो आणि मित्र ही नसतो याची जाणीव सर्व सामान्य कार्यकर्ता आणि जनतेनी ठेवणे आवश्यक आहे. बर हे कमी की काय म्हणून काही अतीउत्साही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आपली स्वतःची लायकी न पहाता कोणत्याही मोठ्या प्रभावी आणि सर्वमान्य  राजकीय नेत्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकेरी उल्लेख करून टिका करतात, अर्थात ही गोष्ट मनाला न पटणारी आहे. कारण एक चांगला राजकीय नेता घडण्यासाठी कमीत कमी पंचवीस वर्षे लागतात तेव्हाच ते लोकांचे मनावर अधिराज्य करतात हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे टिका करताना प्रथमतः आपण आपली लायकी तपासलीच पाहिजे आणि नंतरच टिका टिप्पणी केली पाहिजे.  आताची परिस्थिती पाहिली तर काँग्रेस पक्षाला आपले स्वतःचे घर सांभाळता येत नाही हे नुकत्याच देशात घडलेल्या काही राज्यातील घटनांवर नजर टाकली की स्पष्टपणे दिसून येते. आता कोविड-19 चा प्रसार होऊ नये म्हणून साठ वर्षे वयाच्या नागरिकांनी व दहा वर्षाचे आतील मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे, तसेच साठ वर्षे वयाच्या कलाकारांनी चित्रपट, मालिका शूटिंग मध्ये भाग घेऊ नये अशी सूचना सरकारने केली आहे.  अर्थात आरोग्यासाठी हे योग्य आहे. पण मग राजकारणात असणारे साठ वर्षे वयाचे तरूण घराबाहेर का पडतात असा प्रश्न सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री विक्रम गोखले साहेब यांनी उपस्थित केलाय. तसेच राजकारण ही नोकरी आहे की समाजासेवा आहे, नोकरी असेल तर पगार मिळत नाही आणि समाजसेवा असेल तर पैसे घालून निवडणुका का लढवायच्या असा प्रश्न चित्रपट अभिनेते श्री नाना पाटेकर साहेब यांनी उपस्थित केलाय. खरोखरच हे दोन्ही प्रश्न विचार करायला लावणारेच आहेत. अर्थात राजकीय लोकांचे  धोरण म्हणजे "दुखतंय टोणग्याचं अन् इंजेक्शन पखालीला" अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.     

आता तर देशात किंवा कोणत्याही राज्यात काहीही राजकीय कोणत्याही प्रकारची घटना घडली की त्याला जबाबदार फक्त भाजप आणि केंद्र सरकारच आहे हे सुत्रच झालंय. महाराष्ट्रात आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. आता महाराष्ट्रात राजकीय किंवा सामाजिक कोणत्याही प्रकारची घटना घडली की त्याला जबाबदार फक्त भाजपाला धरले जाते. पुर्वी हे तिनही पक्ष एकमेकांना पाण्यात पहात होते. अगदी खालच्या थराला जाऊन टिकाटिपन्नी करत होते. आता तिघं पक्ष एकत्रित आले तर सर्वच पवित्र झाले. तसेच पहिल्यांदा कर्नाटक राज्यात घडले. कुमारस्वामीचे सरकार पुर्णपणे टिकले नाही, आपसात भांडण झाले आणि सत्तेसाठीच काही आमदार स्वतः बाहेर निघून सरकार पाडले. तेव्हा पण बातमी वाचली की, केंद्र सरकारने आमदारांवर दबाव आणला आणि सरकार पाडले. त्यानंतर मध्यप्रदेश मध्ये सुद्धा महाराज ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस च्या विरोधात बंड केले आणि ते आपल्या सहकारी आमदारांना घेऊन भाजप मध्ये सामील झाले. तेथील काँग्रेस पक्षाचे सरकार कोसळले. त्याला सुध्दा भाजपाला जबाबदार धरले. आता राजस्थान मध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांचेच पक्षाविरूध बंडाचे निशाण फडकवले आणि ते काँग्रेस मधून आपल्या सहकारी आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्याला सुध्दा भाजपाला जबाबदार धरले. आता जर आपलाच दरवाजा आपल्याच लोकांनी उघडा ठेवला तर कोणी तरी "टकटक"  करून जाणारच ना.तेव्हा पहिल्यांदा आपलं घर व्यवस्थित सांभाळलं पाहिजे आणि मग दुस-ला दोष दिला पाहिजे असे वाटते. सध्या तरूणाईला राजकारणात चांगली संधी मिळाली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळेच सर्व सामान्य जनता तरूण नेत्याच्या पाठीमागे आहे हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान मधील प्रकरणावरून पहायला मिळाले.  सध्याच्या लाॅकडाऊन च्या काळात अनेक व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. एकीकडे जनता रोजगार शोधून आपले कुटुंब व मुलाबाळांसह जीवन जगत आहेत तर दुसरीकडे राजकीय पक्षांचा कलगीतुरा  जोरात रंगला आहे. मित्रांनो, राजकारणात मैत्री जरूर करा पण मैत्रीत राजकारण करू नका हि विनंती. सगळेच राजकीय नेते मंडळी जनतेच्या भल्यासाठी राजकारणात येतात असे नाही तर काही राजकीय नेते यांना समाजाची, गोरगरीब लोकांची आणि देशसेवा करण्याची जाण आणि इच्छा आहे म्हणून ते राजकारणात सहभागी होतात. असे स्वछ चारित्र्याचे अनेक सन्माननीय राजकीय नेते मंडळी आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्या कार्याला आणि समाजसेवेला सलाम केलाच पाहिजे. सध्या कोविड-19 च्या काळात आपण आपली व परिवाराची काळजी घ्यावी हि विनंती. शासकीय आदेश पाळूनच घराबाहेर जावे अन्यथा घराबाहेर पडू नये हि विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

99 22 545 545

जाहिरात
Search
विडिओ
Recent News