थोडंसं मनातलं : सणउत्सवावर
पुणे विठ्ठल होले प्रतिनिधी :कोरोना संसर्गामुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असल्याने श्रावणी सोमवार चे व्रत कसे अंगीकारावे ? सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. यामुळे हिंदूंचे विविध सण, उत्सव, व्रते नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. कोरोनासारख्या आपत्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास आपद्धर्म असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे आपदि कर्तव्यो धर्मः । म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. या काळातच श्रावण महिना येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या पद्धतीने या कालावधीतील सामूहिक रूपाने साजरे करण्याची परंपरा असलेले विविध सण आणि व्रते नेहमीप्रमाणे अंगीकारता येणार नाहीत. या दृष्टीने प्रस्तुत लेखात सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून श्रावणातील सोमवारी करण्यात येणारे श्रावणी सोमवार हे व्रत कसे करावे, याचा विचार करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे यातून शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितीयत्व अधोरेखित होते.
श्रावणी सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे. ‘लॉकडाऊन’मुळे जेथे घराबाहेर पडून शिवालयात जाणे शक्य नाही, त्यांनी आपद्धर्मा चा भाग म्हणून घरी राहूनच हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी लेखात धर्मशास्त्राधारित विवेचन करण्यात आले आहे.
1. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करणे
उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।
वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ॥ - स्कन्दपुराण, ब्रह्मखण्ड, अध्याय 8, श्लोक 10
अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी. शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.
2. शिवाची पूजा कशी करावी ?
अ. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.
आ. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.
इ. शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.
ई. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ॐ नमः शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.
- श्री. दामोदर वझे संचालक, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, गोवा