"वकीलांचा सुर्य "भास्कर " मावळला"...ॲड शिवाजी कराळे


"वकीलांचा सुर्य "भास्कर " मावळला"...ॲड शिवाजी कराळे

थोडंसं मनातलं....

काल सकाळी सकाळी अहमदनगर वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष ॲड भुषण ब-हाटे साहेब यांचा फोन आला, त्यांनी फक्त एवढेच म्हटले " अण्णा कळाली ती बातमी खरी आहे का? . मी क्षणभर गोंधळात पडलो कारण तो मी पर्यंत मोबाईल बघीतलाच नव्हता. मग त्यांनीच सांगितले, "अण्णा आदरणीय श्री भास्करराव आव्हाड सर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले आहे". पाया खालची वाळू सरकल्याचा भास झाला अन् मी पटकन सरांचे भाचे श्री गणेश सिरसाठ सर यांना फोन केला. श्री शिरसाट सरांचे तिकडून फक्त खोल गेलेल्या आवाजात एकच वाक्य ऐकायला मिळाले, " अण्णा बातमी खरी आहे सर गेले ". त्यानंतर मी मोबाईल वर पाहिले तर वकीलांचे सर्व ग्रुपला फक्त एकच मेसेज फिरत होता," ॲड भास्करराव आव्हाड सर यांचे आज पुणे येथे दुखःद निधन झाले आहे , सरांना  भावपूर्ण श्रद्धांजली ". मन सुन्न  सुन्न झालं. 

ॲड भास्करराव आव्हाड सर म्हणजे न्यायपालिकेला अनेक न्यायाधीश देणारे "विद्यापीठ" आणि वकीलांचे "आधारवड" च होते. वकीली बरोबरच साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे आदरणीय ॲड श्री भास्करराव आव्हाड सर यांची आज "कोविड-19" बरोबरची लढाई अखेर अपयशी ठरली. श्री आव्हाड सर हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील शिराळ चिचोंडी येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले महान व्यक्तिमत्व. अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण करून पुणे येथे वकीली व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर त्यांनी "आव्हड लाॅ क्लासेस " सुरू केले. या क्लास च्या माध्यमातून आदरणीय ॲड श्री भास्करराव आव्हाड सर यांनी न्यायपालिकेला अनेक न्यायाधीश दिले. आजही सरांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात न्यायाधीश या पदावर काम करत आहेत. ख-या अर्थाने वकीलांचा सुर्य " भास्कर " मावळला असंच म्हणावं लागेल.माझे आणि आव्हाड सर यांचे अगदी स्नेहाचे संबंध होते. सर जेव्हां जेव्हां अहमदनगर च्या दौ-यावर येत तेव्हा तेव्हा ते पुण्यातून निघताना, " काय शिवाजी कुठं आहेस रे,मी नगरला येतोय, आपण भेटू या" असा नियमानुसार फोन करायचे. सरांचे बरोबर अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी झालो होतो. कोणत्याही कारणास्तव सर दिलेली वेळ आणि कार्यक्रम कधीच रद्द करत नव्हते. सन 2013 साली मी अहमदनगर वकील संघाचा अध्यक्ष असताना आम्हाला न्यायाधीश  परिक्षेची तयारी करण्यासाठी क्लास सुरू करायचे होते. तेव्हा मी सरांना फोन केला आणि सरांनी लगेच सांगितले की, "गणेश येईल नगरला, तु काळजी करू नको". आणि आदरणीय श्री गणेश सिरसाठ सर यांनी क्लास घतले. महाराष्ट्रातील कोणत्याही वकीलांचे प्रश्न अगदी सहजपणे सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेले व्यक्तीमत्व अचानक निघुन गेल्याने न्यायपालिका व वकील मंडळी यांचे कधीच भरून न येणारे नुकसान झाले आहे. आदरणीय ॲड श्री भास्करराव आव्हाड सर यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळाले. एकदा 2018 मध्ये जिल्हा परिषद अहमदनगर चे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्व उत्तमराव करपे साहेब यांचे इंग्रजी शाळेत स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आम्ही दोघे प्रमुख पाहुणे म्हणून गेलो होतो. तेव्हा सरांनी मराठी भाषा किती महत्वाची आहे या विषयावर केलेले भाषण पालक आणि विद्यार्थी यांना प्रेरणादायी ठरले. त्याचे दुस-या दिवशी आम्हाला श्री गोरख लाड सर, कांतीलाल गर्जे सर, बापुसाहेब फसले सर यांचे आष्टी जि बीड येथील साने गुरुजी सामाजिक प्रतिष्ठान च्या राज्य स्तरावरील पुरस्कार वितरण सोहळ्याचे कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते. सर अगदी सकाळी सकाळी तयार होऊन मला घ्यायला आले. आष्टी च्या कार्यक्रमात तर सरांचे विचार ऐकून नागरिकांनी फोटो काढून घेण्यासाठी अक्षरशः सरांना गराडाच घातला. अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक वकील संघाचे सन्माननीय सदस्याना सर नेहमीच मदत करत होते. महाराष्ट्रील जनतेच्या प्रेमामुळेच सर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र चे चेअरमन, मराठी साहित्य परिषद पुणे चे अध्यक्ष होते. आदरणीय ॲड श्री भास्करराव आव्हाड सर यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. साधारणतः डिसेंबर 2019 अहमदनगर बार असोसिएशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे वतीने अहमदनगर जिल्हा न्यायालयात ज्युनियर व सिनियर वकीलांचे मार्गदर्शना साठी श्री आव्हाड  सरांचे व्याख्यान आयोजित केले होते. व्याख्यान संपल्यानंतर आम्ही सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर चे सचिव न्यायाधीश श्री सुनिलजीत पाटील साहेब यांचे चेंबरमध्ये चहा घेण्यासाठी गेलो. तेवढ्यात मला उद्देशून सर म्हणाले, " काय शिवाजी अर्टिकल लिहितोय ना, छान लिहतोय, मला आवडतात, मी वाचतो तुझे अर्टिकल"  क्षणभर मला आभाळ ठेंगणेच झाले. कायदा क्षेत्रातील एवढ्या मोठ्या सह्याद्री ने एका छोट्या टेकडीच्या पाठीवर टाकलेली ती शाबासकीची थाप होती.

सर खरंच तुम्ही आमच्यातुन निघून गेलात यावर विश्वासच बसत नाही. सर आता कोणत्याही कार्यक्रमाचे साठी तुमचा मला कधीच फोन येणार नाही की, माझे तोडकं मोडकं  अर्टिकल वाचून "छान लिहिलंय" असं आता तुम्ही म्हणणार नाहीत. 

सर काल दिवसभर टिव्ही चॅनल वर फक्त तुमचीच " कोविड-19 बरोबर ॲड श्री भास्करराव आव्हाड सर यांची अपयशी झुंज संपली " अशीच बातमी फिरत होती. सर काल महाराष्ट्रातील जवळपास सर्व वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष व सदस्य यांनी तुम्हाला श्रद्धांजली म्हणून न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते.  वकीलांचे गुरू आणि न्यायपालिकेला अनेक न्यायाधीश देणारे विद्यापीठ म्हणजे सुर्य "भास्कर"   सर्वांना अंधारात लोटून "मावळला" आहे. आदरणीय ॲड श्री भास्करराव आव्हाड सर आपणास महाराष्ट्रील तमाम वकील मंडळी च्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली. 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

99 22 545 545

जाहिरात
Search
विडिओ
Recent News