थोडंसं मनातलं.... "आभाळच फाटलंय तर ठिगंळं तरी कुठं कुठं लावायचे?" ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील


थोडंसं मनातलं....  "आभाळच फाटलंय तर ठिगंळं तरी कुठं कुठं लावायचे?"   ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील

नमस्कार मित्रांनो, 

संपूर्ण देशातील जनता कोविड-19 च्या प्रसाराने हैराण झाली आहे. कोरोना बाधीत रुग्णांची संख्याचे दृष्टीने सध्या तरी देशात आपला महाराष्ट्र एक नंबरवर आहे. दिवसेंदिवस कोविड-19 बाधीत रूग्णाची संख्या वाढत आहे, परंतु प्रशासन कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम करत आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील कोविड-19 चे रूग्ण दोनहजाराचे वर गेलेले असले तरी निम्मे रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता आमदार श्री संग्राम भैय्या जगताप यांचे पुढाकारातुन अहमदनगर मधील विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन आयुर्वेद काॅलेज येथे कोविड-19 चे खाजगी हाॅस्पिटल सुरू केले तर महापालिका प्रशासन यांनी सुद्धा कोविड-19 चे रूग्णाची व्यवस्था करण्याचे दृष्टीने 100 खाटाचे हाॅस्पिटल उपनगरात एका लाॅन मध्ये सुरू केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील व शहरातील जनतेच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु सध्या सरकारने कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी दवाखान्याचे होणारे बीलाचे बाबतीत जनतेला मदतीचा हात देणे आवश्यक आहे. कोरोना चा पेशंट खाजगी हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट  झाला तर त्याचे बील काही लाखात येते आणि ते सर्व सामान्य जनतेला परवडणारे नक्कीच नाही. या बीलाचे बाबतीत नेहमीच हाॅस्पिटल प्रशासन आणि जनता या मध्ये वाद निर्माण झाले, कधी कधी राजकीय पक्ष व त्यांचे नेते मंडळी आणि डाॅक्टर याचेत सुद्धा वाद होतात. मुंबई येथील एका कोरोना बाधीत पेशंट चे बील मुंबई मधील हिरानंदानी हाॅस्पिटल ने आठ लाख रुपये केले होते ,परंतु दुर्दैवाने  त्या पेशंट चा मृत्यू झाला. तर पेशंट चे नातेवाईक जो पर्यंत आठ लाख रुपये भरीत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला नाही यावरून सुद्धा वाद झाला. सध्या भ्रष्टाचार बोकाळला आहे, जो तो फक्त पैसे कमावण्या साठीच काम करतात की काय हि शंका सुद्धा मनात येते. पुर्वी अनेक सिनेमात औषधांचा  भ्रष्टाचार करणारे डाॅक्टर, कायद्याचा दुरूपयोग करणारे पोलिस, अधिकारी, सत्तेसाठीच खुन करणारे राजकीय  नेते मंडळी दाखवले जात होते आणि समाजप्रबोधन केले जात होते. परंतु सध्या सुध्दा तीच परिस्थिती प्रत्यक्षात पहायला मिळते. लाॅकडाऊन च्या काळात सुद्धा अनेक ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेड टाकल्या आहेतच आणि भ्रष्टाचार करणारे लोकसेवक यांचेवर कारवाई केली आहे. तसेच पोलिस प्रशासन यांनी सुध्दा अहमदनगर जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसाय करणारे लोकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु एवढं करून सुद्धा भ्रष्टाचार कमी होईल अशी शक्यता नाही.  अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आणि जेष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे साहेब यांचे प्रयत्नामुळे आलेल्या "माहिती अधिकार " कायद्याचा सुद्धा दुरूपयोग करून भ्रष्टाचार करणारे लोक आहेतच. वास्तविक पहाता भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे हे ओळखूनच मा.अण्णा हजारे साहेब यांनी भ्रष्टाचाराचे विरोधात अनेकदा अंदोलने केली आणि सरकारला धारेवर धरले.  न्यायपालिके च्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप होतो की काय अशी शंका सुद्धा नुकतेच उत्तरप्रदेश मध्ये घडलेल्या विकास दुबे प्रकरणा मुळे लोक घेत आहेत कारण एवढे गंभीर गुन्हे असताना विकास दुबे याला जामीन झालेच कसे या बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्वतः लक्ष घातले आहे. तसेच पोलिस विकास दुबे च्या घरी येणार असल्याची माहिती कोणत्या पोलिसांनी दिली याचा पण शोध घेतला जातोय. तसेच पुर्वी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यांनी सुध्दा एका स्वतंत्र पत्रकार परिषदेत बोलताना न्यायपालिका चे कामकाजा बाबतीत  नाराजी व्यक्त केली होती. परंतु अजुनही न्यायपालिकेवर सर्व सामान्य लोकांना विश्वास आहे हे सुद्धा नाकारता येणार नाही. परंतु एकंदरीत सगळी शासकीय व्यवस्थाच घोटाळयांनी पोखरून गेली आहे हे अनेक प्रकरणावरून पहायला मिळते. एका दवाखान्यात असाच काहीसा प्रकार आठ दिवसापूर्वी एका ठिकाणी घडला. तेथील एका वाॅर्ड बाॅय ला वयोवृद्ध पेशंट चे  स्ट्रेचर ओढण्या साठी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने स्ट्रेचर ओढण्यासाठी नकार दिला, त्या वयोवृद्ध पेशंट च्या सहा वर्षे वयाच्या नातवाने स्ट्रेचर ढकलून नेले या बाबतीत फेसबुक वर व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच अनेक दवाखान्यात बेडशीट, पिलोकव्हर, पीपीई किट, हॅन्डग्लोज आणि इतर साहित्य यांचे बील सुध्दा कोरोना बाधीत पेशंट कडूनच वसूल केले जातात अशी माहिती सुद्धा फेसबुक आणि व्हाॅटस अप च्या माध्यमातून फिरत आहे. वास्तविक पाहता शासनाने जर कोविड-19 चे पेशंटची दर आकारणी ठरवून दिलेले असतांना सुद्धा असे अपप्रकार घडतात हे दुर्दैव आहे. अगदी काल परवा अहमदनगर मध्ये एका वीस बावीस वर्षाचे महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली, परंतु सदर महिलेने तिच्यावर होत असलेले सगळे अत्याचारांना कंटाळून पुणे येथील पोलिस प्रशासन यांचे कडे धाव घेतली पण तिथले पोलीस अत्याचारी नराधमाने मॅनेज केले असल्याचे उघड झाले आहे. कोणत्याही विभागाचे काम लाच दिल्याशिवाय होत नाही हे मात्र त्रिवार सत्य आहे. परंतु अशा लाचखोर लोकसेवका मुळे प्रामाणिक पणे काम करणारे अधिकारी, कर्मचारी, लोकसेवक आणि प्रशासन बदनाम होते. कोविड-19 च्या काळात लाॅकडाऊन व संचारबंदी असताना सुद्धा बेजबाबदार लोकांनीच बेकायदेशीर व्यवसाय करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. परंतु हे कुठे तरी थांबायला पाहिजे, बिचारी गोरगरीब जनता आणि सर्व सामान्य मध्यमवर्गीय लोकांचा नक्की बळी जातोय. कोरोना हा संसर्गजन्य विकार आहे, त्यामुळे अनेक लोकांना त्याची बाधा झालेली आहे. त्याचा संपूर्ण खर्च हा सरकारने व महापालिका प्रशासन यांनी करणे आवश्यक आहे. लाॅकडाऊन च्या काळात अनेक व्यवसाय बंद असल्याने अर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. आता जनताच कसे तरी आपले जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत खाजगी  दवाखान्यात उपचार घेणे परवडणारे निश्चितच नाही." ज्याचा वशिला त्याचे कुत्रे काशीला, अन् ज्यांना नाही वशिला त्याचा माणूस फाशीला " अशी पुर्वी एक म्हण समाजात रूढ झाली होती, आता तशीच काहीशी परिस्थिती सरकारी दवाखान्याचे बाबतीत निर्माण झाली आहे. परंतु सगळेच अधिकारी आणि पदाधिकारी व डाॅक्टर भ्रष्टाचारी नसतात हे सुद्धा खरे आहे. आजही काही डाॅक्टर मंडळी स्वतः ची आणि आपल्या परिवाराची काळजी न करता  काम करत आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे. तसेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये ज्यांना उपचार घेणे परवडणारे नसेल त्यांनी शासकीय दवाखान्यात उपचार घ्यायला काहीच हरकत नाही.   "सध्या सगळं आभाळच फाटलंय तर ठिगळं तरी कुठं कुठं लावायचे"  हाच प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक हो अजुन ही भय संपले नाही याची जाणीव असू द्या. जनता सुरक्षित रहावी म्हणून प्रशासन, लोकप्रतिनिधी, डाॅक्टर आणि नर्स आपले जीव धोक्यात घालून कामं करत आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे. आपण घराबाहेर पडताना सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स या  "एसएमएस" चे काटेकोर पालन करावे ही नम्र विनंती आहे. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद 

ॲड शिवाजी अण्णा कराळे पाटील 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर 

99 22 545 545

जाहिरात
Search
विडिओ
Recent News