इंदापूरच्या पूर्व पट्टयात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये घबराहट


इंदापूरच्या पूर्व पट्टयात बिबट्याच्या वावराने नागरिकांमध्ये घबराहट

इंदापूर (प्रतिनिधी) काकासाहेब मांढरे:

चांडगाव भागात बिबट्याचे दर्शन ; एका शेळीचा फडशा ; भीतीपोटी उजनीचा काठ हादरला 

इंदापूर तालूक्यातील उजनी जलाशयाकाठच्या भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रूक, चितळकरवाडी भागात बिबट्याचा वावर दिसला असून बिबट्या सहा वर्षानंतर दिसल्याने उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज (बुधवारी) सकाळी  शेतक-याच्या शेळीचा फडशा बिबट्याने पाडला आहे. त्यामुळे  ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहा वर्षापूर्वी उजनीकाठच्या भागात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता व तो पहिल्यांदाच आढळून आला होता. त्यामुळे बारामती व इंदापूर तालु्क्यानंतर आजवर कधीच न आढळलेला बिबट्या उजनीकाठावर फिरू लागल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आज सकाळी बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याचे कळविण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणा-या  भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रूक, चितळकरवाडी या गावातील ग्रामस्थांनी स्वतः बिबट्या पाहिल्याचे म्हटले आहे. उसाचे क्षेत्र अधिक असल्याने या भागात बिबट्य़ाने घर केल्याचा अंदाज आहे. आज सकाळी भावडी येथील शेतकरी सोमनाथ मदने यांच्या शेळीचा वन विभागाच्या हद्दीजवळील बळशिदबुवा मंदीरानजिकच्या शेतात बिबट्याने फडशा पाडला. दरम्यान आगोती क्रमांक 1 चे शिवाजी गोळे, भावडीचे सोमा मदने, वरकुटे बुद्रुक चे प्रतापराव फाळके, शिवाजी पाडूळे, चितळकरवाडीचे वैभव चितळकर या ग्रामस्थांनी आपण प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचे म्हटले आहे. शिवाजी गोळे यांनी बिबट्याचे ठसे शेतात असल्याचे सांगितले. याबाबत इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना बिबट्या नदीकाठच्या गावात आला असल्याची माहिती दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काळे यांनी कर्मचारी यांना लगेच सांगतो असे सांगितले. दुपारी बारा वाजल्यापासून या भागातील ग्रामस्थ काळे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते.

या भागातील शेतक-यांच्या म्हणण्यानुसार या भागात ऊसाचे प्रचंड प्रमाणात क्षेत्र असताना आठवड्यातून तीन दिवस रात्री शेतीकरीता वीज असते. तीन दिवस रात्रीच्या वेळी अंधारात शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे आम्हाला  भिती वाटत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News