इंदापूर येथे गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना अटक. ६ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ३२ किलो गांजा जप्त .


इंदापूर येथे गांजाची तस्करी करणार्‍या दोघांना अटक.  ६ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ३२ किलो गांजा जप्त .

इंदापूर( प्रतिनिधी) काकासाहेब मांढरे :पुणे ग्रामीणचे दहशतवाद विरोधी पथक व इंदापूर पोलीसांच्या सतर्कतेमुळे आज पहाटे (दि.२१ जुलै) इंदापूरात ६ लाख ५५ हजार रुपयांचा गांजा व दोन आरोपी पकडले गेले. फिरोज हबीब शेख (वय ४० वर्षे, रा.विसापूर, ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर), विशाल रंगनाथ आढाव (वय २२ वर्षे, रा.रेवती पाढळी ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पुणे ग्रामीणच्या दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक फौजदार अर्जुन हरिबा मोहिते यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

    सविस्तर हकीकत अशी की, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे आपल्या सहका-यांसह  आज (दि.२१ जुलै) पहाटे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीची गस्त घालत होते.पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास याच परिसरात गस्त घालत असणा-या पुणे ग्रामीणच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक फौजदार मोहिते यांना गांजाची तस्करी करणारे दोन इसम गांजा घेवून दुचाकीवरुन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन पुण्याहून सोलापूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली.त्यांनी ही माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक सारंगकर यांना दिली. सारंगकर यांनी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. शिरगावकर स्वतः कारवाईसाठी आले.

    पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत डोंगराई सर्कलजवळ त्यांनी सापळा रचला.काही वेळानंतर दुचाकीवर असणारे दोन इसम संशयीतरित्या संशयीत माल घेवून येताना पोलीसांना दिसले.त्यांना जागीच पकडून त्यांची नाव पत्ते विचारले. त्यांनी वरील नावे सांगितली. त्यांचेकडील मालाची पाहणी केली असता त्यांच्याकडे ६ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ३२ किलो गांजा मिळून आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील,बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी  नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकरे अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News