थोडंस मनातलं..... "खरंच माणुसकी मेली आहे का" ? ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडंस  मनातलं.....    "खरंच माणुसकी मेली आहे का" ?   ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रहो 

सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 थैमान घालतोय. त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत तसेच कित्येक लोकांना उपासमारीच्या संकटांना सामोरे जावे लागले आहे. सध्या लाॅकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे. तरीही काही लोक बाहेर जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात येतातच. तसेच लाॅकडाऊन व संचारबंदी ची शिथिलता असल्याने काही बेजबाबदार लोक जाणीव पुर्वक उलटे धंदे करत आहेतच. दोन तीन दिवसापूर्वी नगर जामखेड रोडवर एक वीस बावीस वर्षाची तरूणी पुर्ण पणे नग्न अवस्थेत असल्याची माहिती श्री शिवशंभो प्रतिष्ठान चे खजिनदार आणि सेवानिवृत्त सैनिक श्री कुशल घुले मेजर यानां कोणीतरी मोबाईल वरून सांगितले. त्यांनी लगेच दिलासा सेंटर ला फोन केला व स्वतःची चारचाकी गाडी व कपडे घेऊन आले. त्यानंतर त्यांनी माऊली सेवाभावी संस्थेचे डाॅ. सुचेता  धामणे मॅडम  यांना सदर माहिती कळविली. सदरी तरूणी ही सुशिक्षित वाटत होती पण कुठल्या तरी दबावाखालती असल्याने ती फक्त " मला कोरोना झाला आहे, माझ्या जवळ येऊ नका " . परंतु श्री घुले मेजर आणि पोलिस प्रशासन यांनी  सदरच्या तरूणीला डाॅ. धामणे यांचे कडे स्वाधीन केले. आणि त्यानंतर दोन तीन दिवसानंतर डाॅ सुचेता धामणे यांचे  फिर्यादीवरून अभय बाबुराव कडू रा. पुणे याचे विरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हा प्रकार खरंच किती भयानक आहे. खर तर अशा नराधमांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. हा सगळा प्रकार बघुन असे वाटते की,  "खरंच माणुसकी मेली आहे का?" अशा वेळी महिला संघटना आणि सामाजिक संस्था यांनी आवाज उठवला पाहिजे आणि संबंधित तरूणीला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या लाॅकडाऊन च्या काळात सदर तरूण पुण्यावरून नगरला आलाच कसा हा अनुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या तरूणी वर रात्रीच्या काळोखात अत्याचार करून हा नराधम तीला निर्वस्र सोडून निघून गेला. सदर तरूणी नगर जामखेड रोडवर एकटीच चालली असताना काही अंबटशौकिन तिचे मोबाईल वर फोटो काढण्यात मग्न होते परंतु तिला मदत करण्यासाठी कोणी पुढे आले नाहीत. या अगोदर सुद्धा असेच अनेक तरुणीची फसवणूक झालेली आहे, प्रेम प्रकरणातून असे प्रकार घडतात. परंतु अहमदनगर मधील हा घडलेला प्रसंग खरोखरच भयंकर आणि भयानक आहे.यावर आता पोलिस प्रशासन यांनी सदर आरोपी यास कडक शिक्षा होईल या दृष्टीने तपास केला पाहिजे. 


वास्तविक पहाता अशा घटना घडतातच कशा? अर्थात टाळी एका हाताने कधीच वाजत नसते हे सुद्धा खरं असले तरी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन असा अत्याचार करणे गंभीर गुन्हा आहेच. स्री कडे केवळ भोग वस्तू म्हणून पहाता कामा नये. स्री हि फक्त क्षणाची पत्नी असते आणि अंनत काळची माता असते. एका नग्न महिलेचे फोटो काढताना समाजातील अंबटशौकिनांना लाज कशी वाटत नव्हती. आपला भारत देश हा पुरुष प्रधान असला तरीही भारताला आपण "भारतमाता" म्हणतो. परंतु समाजात खरे समाजसेवक सुद्धा आहेत हे सुद्धा नाकारता येणार नाही. डाॅ राजेंद्र धामणे साहेब , डाॅ सुचेता धामणे मॅडम   आणि मेजर कुशल घुले हे त्याचेच प्रतिक आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. नागरिक हो, आपण सुद्धा सतर्क राहिले पाहिजे, कोणत्याही व्यक्तीला अथवा महिला भगिनींना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आपण खंबीरपणे पाठीमागे उभे राहिले पाहिजे. तरच माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येईल. कायदा आणि सुव्यवस्था कडक असताना असे नराधम इतके घाणेरडी कृत्ये करतातच कसे? अशा लोकांना लोकांनीच धडा शिकवला पाहिजे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News