कोरोनावरील रॅपिड टेस्टला शिर्डी येथे प्रारंभ! बाधितांच्या संपर्कातील एकवीस संशयीत व्यक्तींची तपासणी


कोरोनावरील रॅपिड टेस्टला शिर्डी येथे प्रारंभ! बाधितांच्या संपर्कातील एकवीस संशयीत व्यक्तींची तपासणी

 शिर्डी,प्रतिनिधी,राजेंद्र दूनबळे

 शिर्डी,दि.21 : राहाता तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचे तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी परिसरातील संशयीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी रॅपिड टेस्टचा अवलंब करण्याच्या सूचना तालुका प्रशासनास केल्या होत्या. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला रॅपिड टेस्ट किटस् उपलब्ध करुन दिले. या रॅपिड टेस्ट किटच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय, राहाता येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकुळ घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती म्हस्के, डॉ.भिंगारदेव यांच्या पथकाने शिर्डी परिसरातील ओमसाईराम नगर, तांदळस्कर वस्ती येथे प्रत्यक्ष भेटी देऊन कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 21 संशयत व्यक्तींची तपासणी आज केली. यापैकी पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी साईआश्रम येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे तात्काळ निदान व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 20 किट तालुका प्रशासनाला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  

            वाढत्या रुग्णसंख्येचा वेग लक्षात घेऊन राज्य शासनाने जलदगतीने कोरोनाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी रॅपिड अँटीजन बेस्ड तत्वावर आधारित चाचणीला मान्यता दिली असून या चाचणीद्वारे थेट संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी  करण्यात येते. या टेस्टमुळे, ज्या भागात आवश्यकता असेल तेथील संशयीत व्यक्तींच्या स्त्रावाचे नमुने घेऊन त्वरित उपचार मिळणे शक्य झाले आहे, अशी माहिती डॉ.गोकुळ घोगरे यांनी दिली.

            यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगर पंचायतचे मुख्याधिकारी सतिश दिघे, नोडल अधिकारी मुरलीधर देसले, नगर पंचायत कोविड पथक कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News