सोयाबीन मका कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा (फेरोमन ट्रप) वापर !! शेतीशाळा


सोयाबीन मका कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा (फेरोमन ट्रप) वापर !! शेतीशाळा

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                      🌏शेतीशाळा🌏

नमस्कार मित्रांनो !

शेतीशाळा सदराचा आजच्या भागात आपण सोयाबीन,मका, कापुस या पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा वापर केला पाहिजे.या पध्दतीतमशागतीद्वारे,कीड प्रतिकारक वाणाचा वापर यासह यांत्रिक,भौतिक,जैविक कीड नियंत्रण अशा पद्धतीचा संयुक्तिक वापर करून किडींची संख्या व आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवली जाते. कीडनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो.एकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्याचा वापर हा शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळवणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची संख्या शेतामध्ये कमी करणे, असा दुहेरी फायदेशीर ठरू शकतो.

कामगंध फेरोमन सापळा म्हणजे काय

पतंगवर्गीय कीटकामध्ये (Lepidoptera) मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या गंध सोडला जातो.काही कीटकांच्या प्रजातींमध्ये नराद्वारे सोडलेल्या गंधाकडे स्वजातीय मादी आकर्षित होते.तर काहींमध्ये मादी नराला आकर्षून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते. अशा गंधामुळे विजातीय पतंग आकर्षिले जातात.सोयाबीन पिकावरील शेंगा पोखरणारी हिरवी अळी व स्पोडोप्टेरा या पाने खाणा-या अळ्यांच्या मादी विशिष्ठ प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात आणि नर पतंग त्याकडे आकर्षिले जातात. असे गंध कृत्रिमरीत्या गोळ्यांच्या स्वरूपामध्ये सापळ्यामध्ये वापरले जातात.या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात.त्या प्लॅस्टिकच्या सापळ्याला कामगंध सापळे म्हणतात.या गोळ्यांवरील कामगंध हवेत संप्लवन होऊन मिसळतो. हे कामगंध हे प्रजातीनिहाय विशिष्ठ प्रकारचे असून,प्रत्येक  अळीसाठी वेगळ्या प्रकारचा कामगंध असतो.

जगातील कीटकांच्या जवळपास १०० पेक्षा अधिक प्रजातींमधील कामगंधाच्या माहितीची नोंद केली गेली आहे.त्यात भारतातील पिकावर आढळणाऱ्या २०आणि साठविलेल्या धान्यावर येणाऱ्या ७ प्रजातींचा समावेश आहे.

कामगंध फेरोमन सापळा,वापर व त्याचे प्रमाण सापळ्याच्या वरील भागाला छप्पर असून,तिथे ल्यूर बसविण्यासाठी जागा असते. त्याखाली काही मोकळी जागा सोडून पिशवी उभी धरून ठेवण्यासाठी एक कडे असते.

त्यावर प्लॅस्टिक पिशवीबसवलेली असते.हा सापळ्याच्या छप्पर पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट उंचावर राहील अशा प्रकारे काठीला बांधावे.पिशवीचा खालचा भाग बंद करून काठीला बांधावा.

मोठ्या प्रमाणावर कीड पकडण्यासाठी हेक्टरी 15 सापळे किडीनिहाय बसवावेत. तर किडींच्या आगमनाचे संकेत मिळण्यासाठी 1 हेक्टर क्षेत्रास 5 सापळे पुरेसा होतो. कामगंध ल्यूरचे संयुगे वातावरणात ताबडतोब उडून जाऊन नष्ट होतात.तरीही त्यांचा परिणाम साधारणपणे एक महिनाभर टिकतो.ल्यूरच्या पॅकेटवर सांगितलेल्या काळानंतर ल्यूर बदलून नवी लावावी.

सापळ्याच्या पिशवीत अडकलेले पतंग ठराविक कालमर्यादेत काढून पिशव्या रिकाम्या करणे गरजेचे आहे. किडीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक दिसल्यास कीटकनाशकाचा वापर करावा. कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी काढून ठेवावेत, आणि नंतर पुन्हा कामगंध सापळे लावावेत.

विविध कामगंध सापळे यांचा उपयोग 

किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरविण्यासाठी तसेच सर्वेक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी ही प्रलोभने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात वापरणे गरजेचे आहे.

कीडनिहाय कामगंध प्रलोभने

किडीचे नाव - हेलीकॉवर्पा आर्मिजेरा (अमेरिकन बोंडअळी/ घाटेअळी)

फेरोमोन / ल्युर- हेलील्युर (Helilure)

किडग्रस्त पिके- कापूस, कडधान्य,सुर्यफुल,सोयाबीन, वांगी

किडीचे नाव - स्पोडोप्टेरा लीटयूरा (पाने खाणारी अळी)

फेरोमोन / ल्युर- स्पोडोल्युर (Spodolure)किडग्रस्त पिके- कापूस,सोयाबिन,मिरची,तंबाखू

चौकट- कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी कीडनिहाय सापळ्याची निवड करावी. सापळ्यात अडकलेले पतंग 2-3 दिवसांनी काढून नष्ट करावेत.सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीडीसाठी हेक्टरी 5 सापळे वापरावेत.सापळ्यामधील लिंग प्रलोभने 15 ते 20 दिवसांनी बदलावीत.

सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून 2 ते 3 फुटांवर राहील याची काळजी घ्यावी.सापळा वार्‍याच्या दिशेला समांतर असावा,ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील. 

फेरोमन सापळेकामगंध सापळ्यांच्या वापराचे फायदे

किडीचे शेतातील पिकावरील स्थिती ठरविण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यत: उपयोग होतो.

फेरोमोन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्या वेळी कीड व्यवस्थापन पध्दती ठरविता येते.

तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते.

एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांच्या किंमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो. 

सापळ्यातील रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.

रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे परोपजीवी कीटक व मित्र कीटक सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

कीड व्यवस्थापनाची हि पद्धती वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे.

सापळ्यांचा खर्च किटकनाशकंच्या खर्चापेक्षा कमी आहे. सापळ्यांच्या वापरामुळे मानव, पशु,पक्षी,प्राणी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो आमवस्या च्या पाश्र्वभुमीवर नर-मादी पतंगांचा धोका जास्त असतो अशा वेळेला कामगंध सापळे फिरवून सापळे या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला एकात्मिक किड नियंत्रण करता येऊ शकते म्हणूनच शेती शाळा सदरामध्ये आपण यावर माहिती देत आहोत

 सहकार्य -निलेश बिबवे कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी कोपरगाव

जाहिरात
Search
विडिओ
Recent News