कोविड काळात खाजगी रुग्णालय व उद्योजकांना बरोबर घ्यावे.....बाबू नायर


कोविड काळात खाजगी रुग्णालय व उद्योजकांना बरोबर घ्यावे.....बाबू नायर

विठ्ठल होले पुणे

पिंपरी (दि. 18 जुलै 2020) कोरोना कोविड -19 या जागतिक महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने खाजगी रुग्णालय व्यवस्थापन व उद्योजकांना देखील बरोबर घ्यावे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बाबू नायर यांनी जिल्हा अधिकारी नवल किशोर राम आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

         मार्च महिन्यात पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कोविड -19 चे रुग्ण आढळले. यानंतर आयसीएमआरच्या निर्देशानुसार राज्य सरकार व मनपा प्रशासन काम करीत आहे. शहरामध्ये तीन महिन्यात दहा हजारांहून जास्त रुग्णांना कोविड - 19 ची लागण झाली आहे. 160 हून जास्त नागरिकांचा या महामारीत मृत्यू झाला आहे. 2500 हजारांहून जास्त रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालय व क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल आहेत. शेकडो रुग्णांना बेड उपलब्ध नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन रहावे लागत आहे. मनपा प्रशासन व खाजगी रुग्णालय व्यवस्थापनात योग्य समन्वय नसल्यामुळे उपलब्ध बेड संख्या, रुग्णवाहिकांची उपलब्धता नागरिकांना समजत नाही. वेळप्रसंगी रुग्णांना आर्थिक फटका बसतो. यासाठी प्रशासनाने खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापन अधिका-यांशी ऑनलाईन मिटिंग घ्यावी व त्यांच्या अडचणी व सुचनांचा विचार करावा. व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडची संख्या मनपा रुग्णालयात कमी असल्यामुळे अतिजोखिम असणा-या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. यासाठी मनपा रुग्णालयात या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी ताबडतोब निधी व साहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. म्हणून प्रशासनाने यामध्ये टाटा मोटर्स, फोर्स मोटर्स, महेंद्रा अँड महेंद्रा अशा खाजगी कंपन्यांचा सहभाग घ्यावा. या कंपन्यांचा सीएसआर फंडातून निधी व साहित्य मिळविण्यासाठी तत्परतेने समन्वय साधावा. तसेच नागरिकांच्या माहितीसाठी कोविड - 19 साठी उपचार करणा-या रुग्णालय, रुग्णवाहिका, तपासणी केंद्र यांची माहिती व फोन नंबर व्यापकपणे प्रसिध्द करावे, तसेच महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रिय कार्यालयात सर्व माहिती देणारा 24x7 मदत कक्ष उभारावा. अशीही मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News