खाजगी रुग्णालयांना बाधित व्यक्ती आणि तपासणी केलेल्या व्यक्तींची माहिती देणे बंधनकारक...जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी


खाजगी रुग्णालयांना बाधित व्यक्ती आणि तपासणी केलेल्या व्यक्तींची माहिती देणे बंधनकारक...जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी

प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे

दि, १५- जिल्ह्यातील खाजगी रुग्‍णालयांनी त्‍यांचेकडे कोविड सेंटर सुरु केलेबाबत आणि स्‍वॅब घेतलेल्‍या व्‍यक्‍ती व बाधित व्‍यक्‍तींची माहिती तातडीने प्रशासनास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. जिल्‍हयातील काही खाजगी रुग्‍णालयांनी कोविड सेंटर सूरु करुन त्‍या ठिकाणी स्‍वॅब घेणे व कोविड बाधित रुग्‍णानां दा‍खल करुन त्‍यांचेवर उपचार करणे सूरु केलेले आहे. संबधित रुग्‍णालयांना स्‍वॅब घेतलेल्‍या व्‍य‍क्‍तींची माहिती तसेच कोविड - 19 बाधित रुग्‍णांची माहिती व अहवाल जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, अहमदनगर यांना कळविणे बंधनकारक आहे. परंतू खाजगी रुग्‍णालयांकडून कोविड सेंटर सूरु केलेबाबतची माहिती व स्‍वॅब घेतलेल्‍या रुग्‍णांची माहिती प्रशासनास प्राप्‍त होत नसलेबाबतची बाब निर्दशनास आली होती. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

         राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड -19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणुन घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार खालील सूचना देण्यात आल्या आहेत.  खाजगी रुग्‍णालयांनी त्‍यांच्‍याकडेस कोविड सेंटर सूरु केलेबाबत तसेच रुग्‍णालयामध्‍ये असलेल्‍या बेडची संख्‍या, आयसीयू बेडची संख्‍या व व्‍हेंन्‍टीलेटरची संख्‍या तातडीने ग्रामिण भागामध्‍ये तालुका आरोग्‍य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्‍ये वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांना विहित प्रपत्रात कळविणे बंधनकारक राहील. खाजगी रुग्‍णालये / प्रयोगशाळा (लॅब) यांना स्‍वॅब घेताना संबंधीत व्‍यक्‍तींचे SPO2 ची तपासणी करावी. स्‍वॅब घेतलेल्‍या व्‍यक्‍तींची माहिती व सदर व्‍यक्‍तीच्‍या तपासणीमध्‍ये SPO2 कमी असल्‍यास तातडीने ग्रामीण भागामध्‍ये तालुका आरोग्‍य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्‍ये वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांना कळविणे बंधनकारक आहे.

            खाजगी रुग्‍णालयांना स्‍वॅब तपासणी अहवालानूसार कोरोनाची बाधा झाल्‍याचे आढळून आलेल्‍या व्‍यक्‍तीची माहिती तसेच त्‍यांच्‍याकडेस दाखल झालेल्‍या कोरोना बाधीत रुग्‍णांची माहिती व अहवाल तातडीने ग्रामिण भागामध्‍ये तालुका आरोग्‍य अधिकारी व महानगरपालिका हद्दीमध्‍ये वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांना कळविणे बंधनकारक राहील. तसेच संबंधित कोरोना बाधित व्‍यक्‍तींना रुग्‍णालयामध्‍ये आयसोलेशन करुन उपचार करणे बंधनकारक राहील.

            खाजगी रुगणालयांना त्‍यांचेकडेस दाखल असलेल्‍या कोरोनाबाधित रुग्‍ण / व्‍यक्‍ती यांच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींची माहिती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग दरम्‍यान प्रशासनास देणेकामी सहकार्य करणे बंधनकारक राहील. खाजगी रुग्‍णालयांना त्‍यांचेकडेस उपचार घेत असलेल्‍या कोविड रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यास त्याची माहिती विहित नमुन्‍यात जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, अहमदनगर यांचेकडेस सादर करणे बंधनकारक राहील. खाजगी रुग्‍णालयांकडून स्‍वॅब घेतलेल्‍या व कोरोना बाधीत व्‍यक्‍तींबाबतची प्राप्‍त माहिती तालुका आरोग्‍य अधिकारी व वैदयकिय आरोग्‍य अधिकारी, मनपा, अहमदनगर यांनी जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक, अहमदनगर यांना कळवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

            जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच बॉम्‍बे नर्सिग होम (दुरुस्‍ती) अधिनियम 2006 अंतर्गत नोंदणीकृत विविध रुग्‍णालये, नर्सिग होम, दवाखाने (आरोग्‍य सेवा पुरवठादार) यांना कोविड रुग्‍णावर शासनाव्‍दारे निश्चित केलेल्‍या दरांनुसार उपचार करणेबाबत तसेच 80 टक्के उपलब्‍ध खाटांबाबत जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, अहमदनगर यांना दैनंदिन अहवाल सादर करणेबाबत यापूर्वीच निर्देश देण्‍यात आलेले आहेत.

     कोविड -19 चे अनुषंगाने, प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचा भाग म्‍हणून कोविड -19 चाचणी प्रयोगशाळांमध्‍ये जलदगतीने चाचणी व प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर केल्‍यास बाधित रुग्‍णांवर तातडीने उपचार करता येतील. त्‍यास्‍तव, अहमदनगर जिल्‍हयातील कोविड -19 चाचणी प्रयोगशाळा व वैदयकीय व्‍यावसायिकांसाठी सूचना निर्गमित केलेल्‍या आहेत.    

        कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनूसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले  आहे.  *******

जाहिरात
Search
विडिओ
Recent News